![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhRykSzwugubpJG3DJBg0AOpHXWjD0r5FJS4GixaP8T0wum5qtqfQaVRe6cufike7HGhCae0kqY7vsm93AWJ7QOESG2TPYLouIf0p5OX43kmRYY-JM9t5PKIqw5ZHGdBEAX0ITXeRETSEIa/s320/raj.jpg)
राजकारण किंवा सत्ताकारण करत असताना किंवा व्यवस्था बदलण्यासाठी अनेक राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक नेते भावनिक हाक देतात. त्यामुळे कार्य़कर्ते जमा होतात, हे उघड सत्य आहे. सत्ताकारण करणे म्हणजे तेवढे सोपे नाही. `काय हवे : भावनिक आंदोलने की व्यवस्थेत बदलासाठी थेट प्रयत्न` या प्रश्नावर उत्तर ठरलेलं आहे. नेत्यांनी भावनिक आंदोलने न करता व्यवस्थेत बदलासाठी थेट प्रयत्न करावेत, असे म्हणणाऱ्यांचे बहुमत होईल, यामध्ये दुमत नाही.
वृत्तवाहिनीच्या एसी स्टुडिओमध्ये बसून सर्व नेत्यांनी विकासाचे राजकारण केले पाहिजे, अशा सूर आळवणारी तथाकथित `तज्ज्ञ मंडळी` जोरजोराने विकासाचा मुद्दा मांडून एक प्रकारे `भावनिक` मुद्द्याला हात घालतात, हे विसरून चालणार नाही.
माझ्या पत्रकारितेच्या काळात मी स्वतः शिवसेना, मनसे, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस, कम्युनिष्ट पार्टीची आंदोलने `कव्हर` केली आहेत. थेट मुद्द्यावर न येता पहिल्यांदा भावनिक मुद्द्यावर हात घालून नेते सभा जिंकतात, हे त्रिवार सत्य आहे. महाराष्ट्रात गेली 40 वर्षे शिवसेना विविध प्रश्नांवर भावनिक आंदोलने करत आहे. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मैदानात उतरली आहे.
भारत अखंड आहे. जाती-पाती, धर्म, प्रांत, वर्णव्यवस्थेला इथे थारा नाही. याचे राजकारण करू नये. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, वगैरे, वगैरे.......अशी कितीही भाषणबाजी केली तरी शेवटी निवडणूका कशाच्या जिवावर जिंकल्या जातात, हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज पडणार नाही. कधी हिंदुत्व, कधी धर्म, भाषा, प्रांत, वर्णव्यवस्थेच्या नावावर भावनिक आंदोलने केली जातात. त्याला मोठा प्रतिसादही मिळतो हे सत्य आहे. पण, तो विकासाचा प्रश्न तसाच भिजत पडतो हे वास्तव आहे. आपल्याला राजकारण करून पदरात पाडून घ्यायचे आहे. मग, ते कोणत्याही अटीवर हा नियम इथे लागू होतो. मग विकासाच्या पोकळ गप्पा मारल्या जातात. इथे एक छोटे उदाहरण देऊ इच्छितो, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हे माझे गाव. तिथे असलेल्या एका आमदाराने (सध्या ते आमदार शेजारच्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात.) चाळीसधोंडा उपसा जलसिंचन योजना आणण्याची घोषणा सलग पाच वर्षे केली. खरं म्हणजे ही प्रत्यक्षात योजनाच नव्हती. केवळ लोकांना पाण्याचे आमिष दाखवून भावनिक मुद्द्यावर निवडणूक जिंकली. चाळीसधोंडा उपसा जलसिंचन योजना म्हणजे त्या आमदाराने कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेली योजना हे नंतर लोकांच्या लक्षात आले ही वस्तूस्थिती आहे.
लोकांना विकासाचे गाजर दाखवायचे आणि निवडणूका जिंकायच्या. अहो, हरितक्रांती आणली तर लोक आमच्या सभेला कसे येणार, गर्दी कशी होणार असं `ओपन सिक्रेट` त्या आमदारांना सांगितलं. भोळी-भाबडी जनता पुढाऱ्यांवर विश्वास ठेवतात. किंबहुना विकासाचा मुद्दा पटवून देऊन भावनिक मुद्द्याला हात घालण्यात नेते पटाईत असतात. याबाबतीत काही नेते अगदी सराईत आहेत.
1995 मध्ये शिवसेना-भाजप सरकारने बाबरी मशीदचे भांडवल करून भावनिक मुद्द्यावर निवडणूक जिंकली. दुकानावर मराठी फलक लावावेत, मराठी लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, यासाठी मनसेच्या राज ठाकरेंनी मोठे आंदोलन केले. खरं म्हणजे, भावनिक आंदोलने सामान्य जनतेच्या मनात घर करतात. पण, पुढे काय, असा मोठा प्रश्न सर्वांनाच पडतो. मग, इथून सुरु होते बंडाचे निशाण.......ठिणगी पडते क्रांतीची.....पेटतात क्रांतीच्या धगधगत्या मशाली.......
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. बदल करायचा असेल तर तो मुळापासून करायला हवा. इथे मात्र वरवरचा...दिखाऊ बदल नेते करतात. काॅलेज जीवनापासून अण्णा हजारे यांनी आंदोलने मी पाहत आलो आहे. भ्रष्टाचार संपला पाहिजे हा त्यांचा नारा आजही सुरु आहे. पण, राज्यकर्ते मुर्दांड त्यांना काय फरक पडणार....अशी राज्यात किंबहुना देशात किती आंदोलने होतात. आपण आपली सत्ता चालवायची हे सूत्र पक्कं ठरलेले....फार तर आंदोलनाच्या बातम्यांनी वर्तमानपत्रांचे रकाने भरतात. पण, व्यवस्थेत बदलासाठी काय करायला हवे, याची स्पष्ट भूमिका, विचार अजून लोकांपर्यंत जात नाही, हीच मोठी शोकांतिका आहे.
अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये पेटवलेली क्रांतीची मशाल दिल्लीच्या जंतर-मंतरवर तेवली. पण, व्यवस्था बदलण्यासाठी त्यांनी थेट पुढाकार घेतला नाही. रोग काय आहे, हे सांगितले. पण, औषधाची मात्रा मात्र सांगितली नाही. केवळ भ्रष्टाचार संपला पाहिजे. पण, भ्रष्टाचार संपविण्यासाठी राज्यकर्त्यांना हटवून भ्रष्टाचार संपेल का......या प्रश्नाचे उत्तर अण्णा किती प्रामाणिकपणे देतील, याबाबत शंका आहे. अण्णा प्रामाणिक आहेत, हे मान्य आहे. म्हणून तर एवढा जनसमुदाय अण्णाच्या आंदोलनाला पाठिंबा देतो. पण, व्यवस्थेत बदलासाठी अण्णांनी की-पाॅईंटस सुचविले नाहीत.
पुढारी भ्रष्ट आहेत, असे नाही. भ्रष्टाचार हा काही एकटा-दुकटा माणूस करत नाही. त्याची एक मोठी साखळी आहे. त्यावर प्रहार केला पाहिजे. अण्णांचे आंदोलन थंड होते तोवरच रामदेवबाबा यांनी योगाला विश्रांती देऊन भावनिक आंदोलनाची राळ उठविली.
रामदेवबाबांचे आंदोलन कशासाठी, कुणासाठी आहे हे सगळ्यांना माहित आहे. काळा पैसा भारतात आणा, भारतामध्येही नेत्यांकडे बक्कळ काळा पैसा आहे, असे बाबा आंदोलकांना भावनिक साद घालतात. पण, त्यांच्याच स्टेजवर असलेल्या भाजप नेत्यांकडेही काळा पैसा आहे, हे ते मान्य का करत नाहीत? मग, शेवटी आंदोलने कुणासाठी? कशासाठी ?असा प्रश्न पडतो.
विकासाच्या मुद्द्यावर राजकारण न होता भावनिक मुद्द्यावर आंदोलन करण्यावर नेत्यांचा भर वाढतो आहे. जनतेलाही भावनिक मुद्दा विकासाच्या मुद्दयापेक्षा जवळचा वाटतो. आमच्या मंदिराला, मंडळाला, मशीदीला, चर्चला वर्गणी दिली नाही, रंगरंगोटी केली नाही म्हणून उमेदवाराला नाकारणारे मतदार मी पाहिले आहेत. हा उमेदवार माझ्या जातीचा आहे. तो माझ्या धर्माचा आहे, यावर निवडणुका जिंकणारे मी पाहिले आहेत. त्यामुळे मतदारांना जे वाटणार तेच नेते करणार......
अण्णा हजारे व रामदेवबाबा या दोघांनी शक्तीप्रदर्शन करून मीडिया `लाईव्ह` केला. पण, यातून साध्य काय झाले, असा खरा प्रश्न आहे. मला स्वतःला असे वाटते की, बदलाची सुरवात स्वतःपासून झाली पाहिजे. एका रात्रीत कधी बदल होणार नाही, हे मला मान्य आहे. पण, अण्णा हजारे, रामदेवबाबा यांनी जागृतीचे काम सुरु केले आहे. ती बदलाची एक पहिली पायरी आहे, असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवायला हरकत नाही. शेवटी समाज बदलला की व्यवस्था बदलते, आणि व्यवस्था बदलली म्हणजे समाज बदलतो, हे खरं आहे. म्हणून बदलासाठी आपण स्वतः मानसिकता बदलून नवा क्रांतीचा, नव्या सदृढ समाजरचनेचा विचार करणे गरजेचे आहे.
आजच्या तरुणांना विकासाची नवी घटना लिहिणारा `बाबासाहेब` हवा आहे. बदल घडविण्यासाठी घाव घालणारा `भीमराव` हवा आहे. भ्रष्टाचार, जातीव्यवस्था, धर्मावर आसुड ओढणारा `जोतिराव` हवा आहे. समतेची पताका रोवणारा `राजर्षी` हवा आहे....बस्स.......आणखीन काय.......!