Thursday, 24 October 2013

बस्स...! आवाज ही पहचान है...!








महाराष्ट्रात आज प्रत्येक एसटी स्थानक, आजूबाजूंच्या दुकानात, हॉटेलमध्ये, चहाच्या टपरीवर त्यांच्या गाण्यांशिवाय दुसरे काही ऐकूच येत नाही... खेडय़ापाडय़ात असा एकही मराठी रिक्षाचालक, टॅक्सी ड्रायव्हर नाही जो प्रवासात त्यांच्या धमाल गाण्यांशिवाय गाडी चालवूच शकत नाही... गावामध्ये लाऊडस्पिकरवर त्यांच्या गाण्यांशिवाय लग्न होत नाही... गावोगावी जत्रेमध्ये त्यांचाच आवाज सर्वत्र घुमत असतो. भले त्यांची गाणी लोकसंगीत बाजाची असतील, भले त्यांची गाणी ‘दुहेरी अर्थाची’ असतील... लोकांनी त्यांना आपल्या पसंतीची पावती दिली आहे. जरी अभिजन वर्गाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असले, तरी रसिकांनी मात्र त्यांना `आपलंच` मानलंय. राजाश्रयापासून ते कायम वंचित राहिले आहेत. शिंदे कुटुंबातील एक नव्हे तब्बल १५ जण गायक आणि संगीतकार आहेत. पण, `आवाज` मात्र एकच आहे. शिंदे परिवारातल्या चौथी पिढीचं खणखणीत नाणं आजही वाजत आहे ते निव्वळ लोकाश्रयावर
मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचं हे शिंदे घराणं. मंगळवेढ्यातील भीमनगरमध्ये आजही त्यांचं घर आहे. लोकगायक आणि संगीतकार स्व.प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणी आजही मंगळवेढेकर जाग्या करतात. मला चांगलं आठवतंय, आमच्या घरीही खरखरत्या लाऊडस्पीकरवर प्रल्हाद शिंदे यांचं `श्रीहरी जगत्पिता दूर करी तो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा` सुरु झालेलं असायचं. आमच्या गल्लीतला गणपती आणि प्रल्हाद शिंदे यांची गाणी असं नादमय समीकरण होतं. आजही गावागावांत पूजेची तयारी होते तेव्हा प्रल्हाद शिंदे यांचा खडा आवाज तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरय्या रे...चरणी ठेवितो माथा`, चिक मोत्याची माळ...गणपती माझा नाचत आला...अशी गाणी असतात. `आता तरी देवा मला पावशील का...? सुख ज्याला म्हनत्यात ते दावशील का? या गाण्यातून काळजात कळ उमटते. काळाच्या ओघात आता खूप बदल झाले आहेत. झंकार बीट्स आले नि गेले. डिस्कोही गेला. थर्टीसिक्स नॉनस्टॉपला मागे टाकणारी फिफ्टीसिक्स नॉनस्टॉप गणेशगीते आली. तरीही, प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या गाण्यांनीच गावांमध्ये अजूनही त्यांची `मोनोपली` कायम ठेवली आहे.
मूळचे मंगळवेढ्याचे शिंदे घराणे असले तरी सध्या ते खूप वर्षापासून मुंबईतच वास्तव्यास आहेत. शिंदे घराण्याची चौथी पिढी लोकसंगीताची सेवा करत आहे. लोकगायक आनंद शिंदेंची आजी सोनाबाई त्याकाळी फार चांगला तबला वाजवायची आणि आजोबा भगवान शिंदे पेटी वाजवायचे. चौकाचौकात त्यांची भजने खूप चांगली रंगायची. सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद ही त्यांची तीन मुले. तिघेही संगीतक्षेत्रात. सदाशिव हे एस.बी. शिंदे उर्फ किसन शिंदे नावाने
गायक म्हणून प्रसिद्ध. नारायण हे एचएमव्ही कॅसेट कंपनीत तबला आर्टिस्ट म्हणून नोकरीला होते. प्रल्हाद शिंदेंना तीन मुले.. आनंद, मिलिंद आणि दिनकर. आनंद शिंदेला तीन मुले हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श तर मिलिंद शिंदेला चार मुले मयूर, अंकूर, मधूर आणि स्वरांजली. दिनकर शिंदेला चार मुले सार्थक, समर्थक, मनोरथ आणि संविधान. विशेष म्हणजे घरातली सगळीचं गायक आणि संगीतकार मंडळी. आताची शिंदे घराण्यातील चौथी पिढी उच्चशिक्षित असली तरीही त्यांनी कलेची सेवा सोडली नाही.
गायक आनंद शिंदे म्हणाले, ``संगीत घरातच असल्यानं लहानपणापासूनच आम्ही वडिलांबरोबर कोरसमध्ये गायला जायचो. तेव्हा कव्वालीच्या मुकाबल्यांचा फार जोर असायचा. नववीला नापास झाल्यावर वडिलांनी हातात तबला दिला आणि माझे शिक्षण तिथेच थांबले. वडिलांचा मार खात खात मी तबला शिकलो. मिलिंद बघूनच शिकला. आम्ही दोघे भाऊ लहान असतानाच कव्वाली मुकाबल्यामध्ये ढोलक वाजवायचो. वडिल कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले की मुंबईचे कार्यक्रम आम्ही करायचो. वडिलांनी त्यानंतर एचएमव्हीसाठी खूप काम केलं. दरवेळी रेकॉर्डिगला ते आम्हा भावंडांना घेऊन जायचे. त्यामुळं आम्हा दोघा भावंडांवर वडिलांच्याच गाण्याची छाप आहे.``
लोकगायक-संगीतकार प्रल्हाद शिंदे यांची लोकसंगीताची परंपरा त्यांचा मोठा मुलगा म्हणजे आनंद शिंदेने तितक्याच जोमाने सुरू ठेवली आहे. ‘जवा नवीन पोपट हा लागला मिठू-मिठू बोलायला’ पासून‘कोंबळी पळाली’ पर्यंतचा आनंद शिंदेचा प्रवास थक्क करणार आहे. आवाजाचा वेगळा बाज, टिपेचा आवाज, गाताना हेल काढण्याची सवय, दुहेरी अर्थाची गाणी... आनंद शिंदेनं लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे. ते फक्त लोकगीतं गात नाही तर अभंग, भक्तीसंगीत, कव्वाली, भावगीतंही चांगल्याप्रकारे गाऊ शकतो हे आनंद शिंदेनं कॅसेटच्या तुफान विक्रीतून दाखवून दिले आहे. `जवा नवीन पोपट हा लागला मिठू-मिठू बोलायला` या गाण्यानं तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली. कॅसेट विक्रीचे सर्व रेकॉर्ड `ब्रेक` केले. तब्बल १६ लाख विक्रमी कॅसेटची विक्री झाली. १९८६ मध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या गाण्याची नोंद झाली. म्हणून आनंद शिंदेला `पोपट` भलताच भावला आहे. आनंद शिंदेकडे दोन-तीन गाडय़ा आहेत. मात्र, एमएच-डब्ल्यू-४८८९ ही सुझुकी कंपनीची बाईक त्यांनी आजही जपून ठेवली आहे. कारण, पोपटाच्या गाण्यावर खूश होऊन व्हीनस कंपनीने ती भेट दिली आहेत्यांनी मंगळवेढ्याच्या बंगल्यावर आणि त्यांच्या गाडीवर पोपटाची चित्रे लावली आहेत. आनंद शिंदे मंगळवेढ्यात येतात, तेव्हा बाजारात फिरताना बहुतांश मंडळी मोठ्या आवाजात मुद्दाम पोपटाचे गाणे लावतात. आनंद शिंदे फक्त स्मितहास्य करत लोकांना नमस्कार करतात.
आनंद शिंदे यांनी गाण्यांच्या जोरावर मोठे नाव आणि पैसा मिळविला. पण, समाजासाठी काय केले? असे लोक टोमणे मारतात. तेव्हा त्यांनी ‘सोनियाची उगवली सकाळ, जन्माला आले भीमबाळ’ आणि ‘वाणी ऐका बुद्धाची’, `ना भाला ना, बर्ची ना घाव पाहिजे...आणि तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे...` या कॅसेट काढल्या आणि तमाम दलित समाजानं आनंद शिंदेला डोक्यावर घेतले.  `महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला, बोला हर हर महादेव बोला...` अशी शिवगीते आणि भीमगीते गाऊन लोकांची मने जिंकली आहेत. परंतु, काही बाबतीत आनंद शिंदे स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवितात. लोकगायक ‘प्रल्हाद शिंदेंची या महाराष्ट्राने कायम उपेक्षा केली. बाप्पा मोरया रे, जगी जीवनाचे सार, चल गं सखे पंढरीला, ऐका सत्यनारायणाची कथा अशी अजरामर गाणी माझ्या वडिलांनी गायली आहेत. महाराष्ट्राच्या संगीतविश्वात त्यांचे फार मोठे योगदान आहे. कित्येक रसिकांनी प्रल्हाद शिंदे यांची गाणी ऐकली आहेत. पण, त्यांना ही गाणी प्रल्हाद शिंदेचीच आहेत, हे माहिती नाही. गायकापेक्षा गाणी हिट होतात, हे ऐकून मनाला यातना होतात.
कितीही सूर मिळवावा
पण सूर हा लागत नाही
कितीही ऐकली तरी भूकही भागत नाही
कथा सत्यनारायणाची,खोटं हे सांगत नाही
आणि त्या प्रल्हादाच्या अभंगाशिवाय
तो पंढरीचा विठोबा जागत नाही’
हा शेर ऐकवून आनंद शिंदे आपलं दु: ख व्यक्त करतो. आतापर्यंत सुमारे १२ हजार गाणी तर २५० चित्रपटांचं पार्श्वगायन शिंदे यांनी केलं आहे. पण, शिंदे घराण्याबद्दल कोणीच बोलत नाही. त्यांच्याबद्दल कधीच कोणी वर्तमानपत्रात छापत नाही. कारण, त्यांना मार्केटिंगचं तंत्र अवगत नाही. त्यांना ‘पीआर’ म्हणजे काय तेच कळत नाही.
आनंद शिंदेंची तीनही मुले गात असली तरी आदर्श शिंदेकडून त्यांच्या खूप अपेक्षा आहेत. कलाकाराला जात-धर्म नसतो. त्याने फक्त कलेची सेवा करायची असते, हे आनंद शिंदेंचे सूत्र आहे. आदर्श शिंदेनं दुनियादारी या चित्रपटात `देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही...सांगा कुठं ठेऊ माथा कळनासं काही...` गाणं गायलं आहे. ते गाणं सर्वाधिक लोकप्रिय असून यू ट्युबवरही सर्वाधिक हिटस त्याच गाण्याला आहेत. `मनसे`चं टायटल सॉंग, नारबाची वाडी, `वंशवेल`मध्येही आदर्शने गाणी गायली आहेत. आदर्शच्या तुफान गाण्यामुळे मुंबईच्या षन्मुखानंद सभागृहात गीत गाताना लोकगायक प्रल्हाद शिंदेंनी आदर्शला हातातले घड्याळ काढून बक्षीस दिले.
माणुसकीचा महासागर
प्रल्हाद शिंदें परिस्थितीने गरीब असले तरी दातृत्व आणि माणुसकीच्या बाबतीत सर्वोच्च स्थानी होती. याचे कित्येक दाखले त्यांची मित्रमंडळी देतात. एकदा सोलापूरहून मुंबईला रेल्वेने प्रल्हाद शिंदे प्रवास करत होते. रेल्वेमध्ये भीक मागणारी लहान मुले होती. त्यांनी प्रल्हाद शिंदेंना पैसे मागितले. परंतु, प्रल्हाद शिंदेंकडे पैसे नव्हते. मंगळवेढ्याहून येताना त्यांनीच मित्रांकडून पैसे उसने घेतले होते. परंतु, या गरीब मुलांना पैसे दिले पाहिजेत, ही भावना त्यांच्या मनात होती. त्यांनी रेल्वेमध्येच सुरेल गाणी गायला सुरवात केली. प्रवाशांनी प्रल्हाद शिंदेंना पैसे दिले. त्यांनी जमलेले सर्व पैसे त्या गरीब भीक मागणाऱ्या मुलांना दिले. रेल्वेत भीक मागू नका, जा आता इथून अभ्यास करा..अशी प्रेमळ धमकी दिली. मुलांनी आनंदाने धूम ठोकली. अंध लोकांसाठी प्रल्हाद शिंदे चॅरिटी शो करायचे. त्यांना पंखा, जीवनावश्यक वस्तू द्यायचे. पैशांच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती खूप महत्त्वाची आहे, असे ते मुलांना सांगायचे. दुसरा एक किस्सा असा की, विजय सरतापे नावाच्या गृहस्थाच्या नातेवाईकाला दवाखान्यासाठी पैशांची अडचण होती. पैसेच कुठूनच जमा होत नव्हते. शेवटी त्यांनी प्रल्हाद शिंदेंना सांगितले. प्रल्हाद शिंदेंनी शेजारच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सुरु होते. तिथे जाऊन भजन व गाणे गायले. लोकांनी आनंदाने पैसे जमा करून प्रल्हाद शिंदेंना दिले. प्रल्हाद शिंदेंनी ते पैसे विजय सरतापे यांनी दिले.
गाणं वाजतच राहिलं पाहिजे
प्रल्हाद शिंदेंना वाढत्या वयामुळे शारिरिक त्रास सुरु झाला. त्यांना हृदयरोगाचा त्रास होता. त्यात त्यांना पाच वेळा हार्ट ऍटॅक आला. गाण्यांचे कार्यक्रम त्यांनी सुरुच ठेवले होते पण, शेवटच्या श्वासापर्यंत गाणे गात राहिले. गाणं हाच माझा श्वास आहे, असे ते म्हणायचे. एवढं ते गाण्यांवर प्रेम करायचे.
`स्वरसूर्य` तळपतच राहील
प्रल्हाद शिंदें यांच्या कार्याची दखल घेऊन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठानं पाठ्यपुस्तकात स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा कार्याचा गौरव केला आहे. कल्याणमध्ये प्रल्हाद शिंदे यांचा पुतळा बसविला आहे. गोरेगाव-लिंक रोडला प्रल्हाद शिंदे मार्ग असे नामकरण केले आहे. तर सोलापूरमध्येही प्रल्हाद शिंदे मार्ग तसेच मंगळवेढ्यात त्यांच्या नावाचे मोठे प्रवेशव्दार उभारले आहे.
तोता मैना ते चिकनी चमेली...
आनंद शिंदे यांची गाणी बॉलीवूड दिग्दर्शकांच्यादेखील आवडीचा विषय झाली. त्यांचे `पोपट`चे गाणे हिट झाल्यावर १९८८ मध्ये `पाप की दुनिया`मध्ये `मै तेरा तोता, तू मेरी मैना` गाणे कॉपी करण्यात आले. प्रसिद्ध गायक किशोरकुमार यांनी ते गाणे गायले होते. अलीकडच्या काळात `कोंबडी पळाली…` या गाण्याचे `चिकनी चमेली…` हे हिंदी व्हर्जन लोकप्रिय आहे. संगीतकार अजय-अतुल यांनी आनंद यांच्याकडून गाणे लिहून घेतले होते. `हाताला धरलंय या...म्हणतीय लगीन ठरलंय या...` या गाण्याचे हिंदी व्हर्जन लवकरच येणार आहे.
अनेक भाषेत गायन
आनंद शिंदे यांनी तमिळ, उर्दु, पंजाबी अशा मुख्य आठ भाषेत गाणी गायली आहेत. आनंद शिंदेंनी एका दिवसात तब्बल १३ गाणी गायली आहेत. हा एक विक्रमच आहे. मुंबईचा पोरगा, झाडीची पोरगी हे माठ आदिवासी गाणेही गायले आहे. जवा नवीन पोपट हा हे गाणे हिट झाल्यावर महाराष्ट्रात वर्षभरात तब्बल एक हजार प्रयोग केले. प्रल्हाद शिंदे यांची गाणी मी गातो तसेच माझा मुलगा आदर्शची गाणीही मी गातो, हे माझे भाग्य असल्याचे आनंद शिंदे आनंदाने सांगतात. आजघडीला सर्वात बिझी गायक म्हणून आनंद शिंदेंकडे पाहिले जाते. मंगळवेढ्याच्या इंग्लिश स्कूल प्रशालेसाठी त्यांनी नुकताच चॅरिटी शो केला. त्यालाही लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता.
आनंद शिंदेंना `नो एंट्री`
सांगली, पुणे आणि सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये आनंद शिंदेंना वेगळे नियम व अटी आहेत. त्यांची उडत्या चालीवरची गाणी भन्नाट आणि लोकप्रिय असल्यामुळे प्रेक्षकवर्ग शिट्या वाजवून बाकड्यांचे नुकसान करतात, अशी तेथील थिएटरच्या व्यवस्थापकाचे म्हणणे आहे. थिएटर हाऊसफुल्ल झाल्यामुळे गर्दीला आवरणे कठीण जाते. त्यामुळे हे नियम लावावे लागतात.
फॅन क्लब अफलातून...
सोलापूरसह सबंध महाराष्ट्रात त्यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. कोणी बनियनवर पोपटाचे चित्र काढतो. कुणी हातावर बॅन्ड, कुणी छातीवर पोपटाचे टॅटू गोंदतो. कोणी दुचाकीवर नंबरप्लेटवर पोपट काढतो. पोपट हा त्यांचा एक `ट्रेडमार्ग`च झाला आहे. लोकांचे प्रेमच आपल्यासाठी ऍवॉर्ड असल्याचे आनंद शिंदे सांगतात.
शिंदेंना टोलमाफी
महाराष्ट्रात सर्व वाहनांना टोल आकारला जातो. मात्र, आनंद शिंदे यांच्या गाडीला टोलमाफी आहे. गाडीवर पोपटाचे चित्र पाहून टोलमाफ केला जातो. उलट, कर्मचारी माझ्यासोबत फोटो काढतात. लोकांचं प्रेमच हे सगळं दुसरं काय म्हणायचं? असे ते नम्रपणे म्हणतात.
काळानुसार बदल आवश्यकच
लोकगायक प्रल्हाद शिंदे हे लोकगीते, कव्वाली, भजन, गणपती गीते, विठ्ठलाची गीते, भीमगीते गायचे. त्यांचा काळ तसा होता. त्या काळात त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर आनंद-मिलिंद शिंदे यांनी उडत्या चालीवरची गाणी गाऊन जनमानसावर अधिराज्य गाजवले. दादा कोंडके यांचा तो काळ होता. त्यावेळी दादा कोंडके यांचाही एक वेगळा चाहता वर्ग होता, किंबहुना आजही तो कायम आहे. त्यामुळे ज्यांना जे आवडते ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आता आनंद शिंदे यांचा मुलगा आदर्श शिंदे युवापिढीला आवडेल अशी गाणी गातोय. दुनियादारीमधील `देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही...`हे गाणे प्रचंड लोकप्रिय आहे. शिंदे कुटुंबिय फक्त `व्दिअर्थी` गाणारे गायक आहेत, अस्सं काही नाही. लोकांना जे आवडतं ते आम्ही करतो. काळानुरुप योग्य ते बदल आवश्यकच असल्याचे आनंद शिंदे यांचा मुलगा हर्षद शिंदे सांगतो.
शिंदे घराण्याच्या रक्तातच गाणं आहे
लोकगायक स्व.प्रल्हाद शिंदे यांचे मंगळवेढ्यातील मार्गदर्शक ह...तात्यामहाराज ऊर्फ बुवा जगताप यांनी प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणी सांगितल्या. प्रल्हाद शिंदे खूप गुणी होता. त्याचा आवाज खूप गोड होता. तो गाताना पथ्ये वगैरे पाळत नसायला. कधी भजी, जिलेबी असे तेलकट पदार्थ खायचा. पण, एकदा का स्टेजवर चढला की मग सर्वांना जिंकायचा. मुंबईतील पानबाजार येथे लीला कुलकर्णी आणि प्रल्हाद शिंदे यांच्यात गाण्यांची जुगलबंदी होती. उडत्या चालीची गाणी सादर करून पठ्ठ्यानं (प्रल्हाद शिंदे) सर्वांची मने जिंकली. मंगळवेढ्याला त्याचे येणे-जाणे होते. बसच्या तिकिटाला पैसे नसले की माझ्याकडून तो पैसे घ्यायचा. जेवायला, गप्पा मारायला तो माझ्याकडेच यायचा. आताही त्यांची मुले आनंद-मिलिंद दोघेही येतात. माझा आशिर्वाद घेतात. प्रल्हाद शिंदेंच्या नंतरही त्यांची मुले अजूनही नम्र आहेत. त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत, यातच त्यांचा सगळा काही मोठेपणा आहे. प्रल्हाद शिंदेंनी प्रेमापोटी माझ्यावर तीन गाणी रचून गायिली आहेत. संत दामाजी मंदिरात अजूनही प्रल्हाद शिंदेंची गाणी गायली जातात.
चळवळ आणि शिंदे घराणे
लहानपणीच परिस्थितीचे चटके बसल्याने चळवळ जागृत ठेवण्याचं काम शिंदे घराण्याने केले आहे. मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करण्याच्यावेळी शिंदे परिवाराने गाण्यांच्या माध्यमातून लोकप्रबोधन केले. सामाजिक, प्रबोधनात्मक अनेक गीते गायिली. लोकभावना जिवंत ठेवण्याचे काम शिंदे परिवाराने केले. भीमजयंतीला हमखास आनंद-मिलिंद यांची गीते असायची. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ते दैवत मानतात. लोकशाहीर वामनदादा कर्डक, विठ्ठल उमप यांच्याशीही त्यांचे नाते जिव्हाळ्याचे होते. तीच परंपरा आता त्यांची मुलेही पुढे करीत आहेत.
व्हर्सटाईल लोकगायक
प्रल्हाद शिंदे यांची परिस्थिती खूपच हलाखीची होती. शेजारच्या गावात बैलगाडीने जाऊन ते कार्यक्रम करायचे. मिळेल ते खायचे. हातात घुंगरू बांधून तबला वादन करायचे. त्यांनी कोणतेही गायनाचे शिक्षण घेतले नव्हते. पंढरपूरची वारी त्यांच्या गाण्यांशिवाय पूर्ण होत नव्हती. मंगळवेढा तशी संतांची भूमी. संत दामाजीपंत, चोखामेळा, टीकाचार्य, स्वामी समर्थ, बसवेश्वर, कान्होपात्रा यांच्यासह अनेक संतांच्या पावनस्पर्शानं पुनीत झालेल्या या भूमीने मला खूप दिलं, अशी त्यांची भावना होती. मंगळवेढे भूमी संतांची...पाऊले चालती पंढरीची वाट, चल गं सखे...चल गं सखे पंढरीला, चंद्रभागेच्या तिरी, उभा विटेवरी...जैसे ज्याचे कर्म तैसे...धरीला पंढरीचा चोर...दर्शन दे रे...दे रे भगवंता...अशी एकाहून एक सरस गाणी गायिली. भावगीते, भक्तीगीते, लोकगीते, भीमगीते, कव्वाली, क्लासिकल असा व्हर्सटाईल लोकगायक होता.
`स्वाभिमानी` प्रल्हाद शिंदे
लोकगायक स्व.प्रल्हाद शिंदे खूप स्वाभिमानी होते. त्यांची घरची परिस्थिती खूप हलाखीची, गरिबीची असली तरी स्वाभिमान त्यांनी कधी गहाण ठेवला नाही. गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांनी त्यांना खास एकदा भेटीचे निमंत्रण दिले. मंगेशकर कुटुंबियांबद्दल त्यांच्या मनात आदर होता. परंतु, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे लतीदीदींनी गायले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझे दैवत आहे. माझ्या दैवताचे गाणे लतादीदींनी गायले नाही, म्हणून त्यांनी लतादीदींचे भेटीचे निमंत्रण नाकारले. हा आंबेडकरी `स्वाभिमानी बाणा` प्रल्हाद शिंदेंनी दाखविला.
लोकगायक स्व.प्रल्हाद शिंदे प्रवेशव्दार
लोकगायक प्रल्हाद शिंदे यांनी मंगळवेढ्याचे नाव सर्वदूर केले. गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी लोकप्रबोधन केले. त्यांच्या कार्याची आठवण राहावी, यासाठी मंगळवेढ्यामध्ये शिवप्रेमी चौकात भलीमोठी कमान नगरपालिकेनं उभारून त्याला लोकगायक स्व.प्रल्हाद शिंदे प्रवेशव्दार असे नाव दिले आहे. यापुढेही स्व. प्रल्हाद शिंदे यांच्या नावाने समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा विचार असल्याचे नगराध्यक्ष धनंजय खवतोडे यांनी सांगितले.
अभ्यासापेक्षा गायनाची आवड
आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे हे दोघे मंगळवेढ्याच्या इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी. परंतु, लहानपणापासून ते वडिलांसोबत कोरसमध्ये गाणी म्हणायला जायचे. कव्वालीचे मुकाबले त्यांना फार आवडायचे. शाळेत मात्र त्यांचे मन फारसे रमले नाही. शाळेत अभ्यासापेक्षा गॅदरिंगमध्ये गाणी म्हणायला त्यांना आवडायचे, अशा आठवणी दलितमित्र कदम गुरुजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कदम यांनी सांगितल्या.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात...!
आनंद-मिलिंदचे मामा रंगनाथ तोंडसे सांगतात, ``आनंद-मिलिंद लहानपणापासून आमच्या घरी होते. लहानपणापासून दोघेही गाणी गायचे. प्रल्हाद शिंदेंची गाणीही दोघे गायचे. आनंद शिंदे पहिलीत असताना मोठ्यानं बाराखडी वाचायचा. गल्लीतली सगळं मुलं ती ऐकायची. पण, गाण्यांमध्येच त्याला विशेष आवड होती. प्रल्हाद शिंदे यांचं `गेला हरी कुण्या गावा…` हे गाणं भन्नाट गाजलं. एचएमव्ही कंपनीनं त्यांना `अभंगांचा बादशहा` म्हटले. भीमगीते, लोकगीते, कव्वाली, भजनं सर्व गाणं गायचे. मंगळवेढ्याशी त्यांचं नातं अजूनही कायम आहे. भीमनगरमध्ये आमचं घरं आहे. ढवळस रोडवर मोठा बंगला बांधला आहे.``
आनंद-विजयाची लगीनगाठ
आनंद शिंदे यांची पत्नीदेखील मंगळवेढय़ाची. १९८२ मध्ये सातवीत शिकत असतानाच त्यांचे आनंद यांच्यासोबत लग्न झाले. लग्नाच्यावेळी दोघांचेही वय लहान होते. शेजारी राहत असल्यामुळे विजयालाच घरची सून बनवायची, असे आनंदची आजी मुक्ताबाई यांचे मत होते. संगीताविषयी असणारे प्रेम विजया यांना ज्ञात असल्याने त्यांनी प्रोत्साहन देण्याचे काम केले. आनंद आजही प्रत्येक गाणे विजया यांना पहिल्यांदा ऐकवतो. त्यांचा होकार मिळाल्यावरच ते गाणे लिहिले जाते..
विजयाच्या रुपात लक्ष्मी आली...
लग्नाच्या वेळी आनंद यांची आर्थिक स्थिती हलाखीची होती. त्यामुळे लग्नात विजया यांना नकली मंगळसूत्र दिले होते. पण ही परिस्थिती बदलायचीच असा त्यांचा निश्चय होता. जिद्दीच्या जोरावर त्यांनी आर्थिक संपन्नता आणली. आर्थिक सुबत्ता जशी आली तशी त्यांनी विजया यांना सोन्याच्या अनेक वस्तू भेट दिल्या. सोन्याने मडवण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले. पायातदेखील सोन्याची जोडवी घालण्यास दिली. यावर आनंद यांच्या नातेवाइकांनी सौभाग्यवती बाईने पायात सोने घालू नये. लक्ष्मी जाते, पतीलाही धोका असतो, असा सल्ला दिला. मात्र, आनंद यांनी विजया हीच माझी लक्ष्मी आहे. तिच्या रूपातच माझ्या घरी लक्ष्मी आली आहे, असे उत्तर दिले.
तिन्ही मुले उच्चशिक्षित
आनंद आणि विजया यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श ही तीन मुले आहेत. हर्षद अ‍ॅनिमेशन इंजिनिअर असून उत्कर्ष डॉक्टर (एमडी) आहे. सर्वात धाकटा असलेला आदर्श संगीत परंपरेचा वारसा पुढे घेऊन जावा, अशी शिंदे यांची अपेक्षा आहे. तिघाही मुलांना गायनाची आवड आहे. उत्कर्षने ‘पावर’ चित्रपटाला संगीत दिले. त्याचप्रमाणे उत्कर्ष आणि आदर्शने मिळून गौरव महाराष्ट्राचा, आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे थीम साँग तयार केले. शिंदे कुटुंबाचे नाव मुलांनी आणखी उज्‍जवल करावे, अशी या दांपत्याची आशा आहे. समाजाने खूप काही दिले त्याची परतफेड करण्याच्या उद्देशाने आनंद यांनी उत्कर्षला डॉक्टर बनवले. ‘स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली असून या संस्थेच्या माध्यमातून गरीब रुग्णांची मोफत सेवा केली जाते.



Friday, 24 August 2012

तोड मर्दा तोड, ही चाकोरी तोड...


राजकारण किंवा सत्ताकारण करत असताना किंवा व्यवस्था बदलण्यासाठी अनेक राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक नेते भावनिक हाक देतात. त्यामुळे कार्य़कर्ते जमा होतात, हे उघड सत्य आहे. सत्ताकारण करणे म्हणजे तेवढे सोपे नाही. `काय हवे : भावनिक आंदोलने की व्यवस्थेत बदलासाठी थेट प्रयत्न` या प्रश्नावर उत्तर ठरलेलं आहे. नेत्यांनी भावनिक आंदोलने न करता व्यवस्थेत बदलासाठी थेट प्रयत्न करावेत, असे म्हणणाऱ्यांचे बहुमत होईल, यामध्ये दुमत नाही. 
वृत्तवाहिनीच्या एसी स्टुडिओमध्ये बसून सर्व नेत्यांनी विकासाचे राजकारण केले पाहिजे, अशा सूर आळवणारी तथाकथित `तज्ज्ञ मंडळी` जोरजोराने विकासाचा मुद्दा मांडून एक प्रकारे `भावनिक` मुद्द्याला हात घालतात, हे विसरून चालणार नाही. 

माझ्या पत्रकारितेच्या काळात मी स्वतः शिवसेना, मनसे, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस, कम्युनिष्ट पार्टीची आंदोलने `कव्हर` केली आहेत. थेट मुद्द्यावर न येता पहिल्यांदा भावनिक मुद्द्यावर हात घालून नेते सभा जिंकतात, हे त्रिवार सत्य आहे. महाराष्ट्रात गेली  40 वर्षे शिवसेना विविध प्रश्नांवर भावनिक आंदोलने करत आहे. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मैदानात उतरली आहे. 

भारत अखंड आहे. जाती-पाती, धर्म, प्रांत, वर्णव्यवस्थेला इथे थारा नाही. याचे राजकारण करू नये. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, वगैरे, वगैरे.......अशी कितीही भाषणबाजी केली तरी शेवटी निवडणूका कशाच्या जिवावर जिंकल्या जातात, हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज पडणार नाही. कधी हिंदुत्व, कधी धर्म, भाषा, प्रांत, वर्णव्यवस्थेच्या नावावर भावनिक आंदोलने केली जातात. त्याला मोठा प्रतिसादही मिळतो हे सत्य आहे. पण, तो विकासाचा प्रश्न तसाच भिजत पडतो हे वास्तव आहे. आपल्याला राजकारण करून पदरात पाडून घ्यायचे आहे. मग, ते कोणत्याही अटीवर हा नियम इथे लागू होतो. मग विकासाच्या पोकळ गप्पा मारल्या जातात. इथे एक छोटे उदाहरण देऊ इच्छितो, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हे माझे गाव. तिथे असलेल्या एका आमदाराने (सध्या ते आमदार शेजारच्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात.) चाळीसधोंडा उपसा जलसिंचन योजना आणण्याची घोषणा सलग पाच वर्षे केली. खरं म्हणजे ही प्रत्यक्षात योजनाच नव्हती. केवळ लोकांना पाण्याचे आमिष दाखवून भावनिक मुद्द्यावर निवडणूक जिंकली. चाळीसधोंडा उपसा जलसिंचन योजना म्हणजे त्या आमदाराने कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेली योजना हे नंतर लोकांच्या लक्षात  आले ही वस्तूस्थिती आहे. 

लोकांना विकासाचे गाजर दाखवायचे आणि निवडणूका जिंकायच्या. अहो, हरितक्रांती आणली तर लोक आमच्या सभेला कसे येणार, गर्दी कशी होणार असं `ओपन सिक्रेट` त्या आमदारांना सांगितलं. भोळी-भाबडी जनता पुढाऱ्यांवर विश्वास ठेवतात. किंबहुना विकासाचा मुद्दा पटवून देऊन भावनिक मुद्द्याला हात घालण्यात नेते पटाईत असतात. याबाबतीत काही नेते अगदी सराईत आहेत.

1995 मध्ये शिवसेना-भाजप सरकारने बाबरी मशीदचे भांडवल करून भावनिक मुद्द्यावर निवडणूक जिंकली. दुकानावर मराठी फलक लावावेत, मराठी लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, यासाठी मनसेच्या राज ठाकरेंनी  मोठे आंदोलन केले. खरं म्हणजे, भावनिक आंदोलने सामान्य जनतेच्या मनात घर करतात. पण, पुढे काय, असा मोठा प्रश्न सर्वांनाच पडतो. मग, इथून सुरु होते बंडाचे निशाण.......ठिणगी पडते क्रांतीची.....पेटतात क्रांतीच्या धगधगत्या मशाली.......

महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. बदल करायचा असेल तर तो मुळापासून करायला हवा. इथे मात्र वरवरचा...दिखाऊ बदल नेते करतात. काॅलेज जीवनापासून अण्णा हजारे यांनी आंदोलने मी पाहत आलो आहे. भ्रष्टाचार संपला पाहिजे हा त्यांचा नारा आजही सुरु आहे. पण, राज्यकर्ते मुर्दांड त्यांना काय फरक पडणार....अशी राज्यात किंबहुना देशात किती आंदोलने होतात. आपण आपली सत्ता चालवायची हे सूत्र पक्कं ठरलेले....फार तर आंदोलनाच्या बातम्यांनी वर्तमानपत्रांचे रकाने भरतात. पण, व्यवस्थेत बदलासाठी काय करायला हवे, याची स्पष्ट भूमिका, विचार अजून लोकांपर्यंत जात नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. 
अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये पेटवलेली क्रांतीची मशाल दिल्लीच्या जंतर-मंतरवर तेवली. पण, व्यवस्था बदलण्यासाठी त्यांनी थेट पुढाकार घेतला नाही. रोग काय आहे, हे सांगितले. पण, औषधाची मात्रा मात्र सांगितली नाही. केवळ भ्रष्टाचार संपला पाहिजे. पण, भ्रष्टाचार संपविण्यासाठी राज्यकर्त्यांना हटवून भ्रष्टाचार संपेल का......या प्रश्नाचे उत्तर अण्णा किती प्रामाणिकपणे देतील, याबाबत शंका आहे. अण्णा प्रामाणिक आहेत, हे मान्य आहे. म्हणून तर एवढा जनसमुदाय अण्णाच्या आंदोलनाला पाठिंबा देतो. पण, व्यवस्थेत बदलासाठी अण्णांनी की-पाॅईंटस सुचविले नाहीत. 

पुढारी भ्रष्ट आहेत, असे नाही. भ्रष्टाचार हा काही एकटा-दुकटा माणूस करत नाही. त्याची एक मोठी साखळी आहे. त्यावर प्रहार केला पाहिजे. अण्णांचे आंदोलन थंड होते तोवरच रामदेवबाबा यांनी योगाला विश्रांती देऊन भावनिक आंदोलनाची राळ उठविली. 
रामदेवबाबांचे आंदोलन कशासाठी, कुणासाठी आहे हे सगळ्यांना माहित आहे. काळा पैसा भारतात आणा, भारतामध्येही नेत्यांकडे बक्कळ काळा पैसा आहे, असे बाबा आंदोलकांना भावनिक साद घालतात. पण, त्यांच्याच स्टेजवर असलेल्या भाजप नेत्यांकडेही काळा पैसा आहे, हे ते मान्य का करत नाहीत? मग, शेवटी आंदोलने कुणासाठी? कशासाठी ?असा प्रश्न पडतो.

विकासाच्या मुद्द्यावर राजकारण न होता भावनिक मुद्द्यावर आंदोलन करण्यावर नेत्यांचा भर वाढतो आहे. जनतेलाही भावनिक मुद्दा विकासाच्या मुद्दयापेक्षा जवळचा वाटतो. आमच्या मंदिराला, मंडळाला, मशीदीला, चर्चला वर्गणी दिली नाही, रंगरंगोटी केली नाही म्हणून उमेदवाराला नाकारणारे मतदार मी पाहिले आहेत. हा उमेदवार माझ्या  जातीचा आहे. तो माझ्या धर्माचा आहे, यावर निवडणुका जिंकणारे मी पाहिले आहेत. त्यामुळे मतदारांना जे वाटणार तेच नेते करणार......
अण्णा हजारे व रामदेवबाबा या दोघांनी शक्तीप्रदर्शन करून मीडिया `लाईव्ह` केला. पण, यातून साध्य काय झाले, असा खरा प्रश्न आहे. मला स्वतःला असे वाटते की, बदलाची सुरवात स्वतःपासून झाली पाहिजे. एका रात्रीत कधी बदल होणार नाही, हे मला मान्य आहे. पण, अण्णा हजारे, रामदेवबाबा यांनी जागृतीचे काम सुरु केले आहे. ती बदलाची एक पहिली पायरी आहे, असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवायला हरकत नाही. शेवटी समाज बदलला की व्यवस्था बदलते, आणि व्यवस्था बदलली म्हणजे समाज बदलतो, हे खरं आहे. म्हणून बदलासाठी आपण स्वतः मानसिकता बदलून नवा क्रांतीचा, नव्या सदृढ समाजरचनेचा विचार करणे गरजेचे आहे.

आजच्या तरुणांना विकासाची नवी घटना लिहिणारा `बाबासाहेब` हवा आहे. बदल घडविण्यासाठी घाव घालणारा `भीमराव` हवा आहे. भ्रष्टाचार, जातीव्यवस्था, धर्मावर आसुड ओढणारा `जोतिराव` हवा आहे. समतेची पताका रोवणारा `राजर्षी` हवा आहे....बस्स.......आणखीन काय.......!

Wednesday, 3 August 2011

प्रिय...

प्रिय...
तुझी आणि माझी मैत्री सात जन्माची...अगदी त्याच्या अगोदरपासूनची...तू नेहमीच माझा होता...माझा आहेस...आणि माझाच मित्र म्हणून कायम राहणार आहेस, याची खात्री आहे मला...

आपली मैत्री कशी झाली, याचा मला अजून उलगडा होत नाही. पण, एक खरं आहे गड्या, शाळेत असल्यापासून आपली दोस्ती पक्की होती. त्याचा धागा अजूनही घट्ट आहे तेवढाच...आपल्या मैत्रीचे धागे तोडायला अजून कुणी जन्मला नाही. कारण, आपली मैत्रीच मुळात विश्वासाच्या धाग्यानं बांधलीय. तो धागा मात्र तोडू नकोस मित्रा...माझी शप्पथ आहे तुला...तुला आठवतंय का...मी तसा लहानपणापासूनच खूप जिद्दी आहे. तू मात्र नेहमीच समजूतदारपणा दाखवला आहेस. समजूतदारपणा हा तुझा स्थायीभावच आहे.

प्रिय...
खरं म्हणजे मी पाहतोय तुझी आवड-निवड वेगळी...माझी वेगळी...तुझ्या सवयी वेगळ्या...माझ्या अगदीच निराळ्या...तरीही तुझं आणि माझं मैत्रीचं नातं कसं काय, हे मला अजून समजलं नाही.

प्रिय...
शाळेत असल्यापासून तुझी आणि माझी मैत्रीची वीण घट्ट झाली. खरं सांगू, मित्रा...वर्गात एवढे सगळे विद्यार्थी असताना तुझी आणि माझीच मैत्री का बरं व्हावी. ऑफिसात एवढे सर्व सहकारी असताना खऱ्या मैत्रीची व्याख्या तुझ्याकडूनच मला का कळावी? खरं सांग, मित्रा...आपल्या दोघांत अस्सं कोणतं रसायन आहे की तुझं आणि माझं जमतं. कोणतं रसायन आहे की, तुझा आणि माझा रंग एक होतो. कित्येक दिवसांपासून मी त्याचा शोध घेतोय, पण त्याचं उत्तर मला मिळत नाही.

प्रिय...
तसा तू खूपच शांत, संयमी आहेस, हे माहित आहे मला. तूच मला नेहमी समजून घेतलं आहेस. चूक की बरोबर यातलं चूक किंवा बरोबर हे तुला चांगलं माहित असतानाही मुद्दाम तू मला जे चूक वाटतं, त्याला तू चूक म्हटलास आणि मला जे बरोबर वाटलं, त्याला तू बरोबर म्हटलास...कशासाठी आणि का..?

प्रिय...
म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषांमागे एका स्त्रीचा हात असतो. पण, खरं सांगू का, माझ्या यशासाठी मात्र तूच माझ्या मागे नाही तर नेहमी बरोबरीत राहिला, हे आठवतंय मला...ते दिवस मी कसे विसरीन रे...

प्रिय...
मी कोणताही निर्णय घेताना तूच मला आधार असायचा...तुझ्या फक्त आधाराने मी कित्येक वेळा `एव्हरेस्ट` सर केलाय. काय ताकद आहे गड्या तुझी...मला कधी समजले नाही. संकटातही तू मला समजावयाचा. तुझ्याशी किती वेळा बोलू...आणिक कित्ती-कित्ती सांगू, असं मला व्हायचं. किती मोबाईलवरूनही बोललं तरी तुझ्याशी बोलावंसं वाटायचं. तुझ्याशी बोलून मी मनमोकळा व्हायचो. माझं ओझंही मी तुझ्या खांद्यावर द्यायचो. पण, तू कधीच थकला नाहीस, दमला नाही, एवढी ऊर्जा तुझ्याकडे आली कुठून रे...

प्रिय...
आठवताहेत ते कॉलेजमधले दिवस...कॉलेजात नेहमी तुझा किंवा माझाच पहिला नंबर असायचा. पण, तू कधीच तुझाच नंबर कायम पहिला येण्यासाठी माझ्याशी दोस्ती तोडली नाहीस. एवढा समजूतदार कसा रे तू...

प्रिय...
कोणताही निर्णय तुझ्याआधी मीच घ्यायचो. (म्हणजे तशी ती माझी जुनी सवय आहे.) पण, तू वडिलधाऱ्या माणसांसारखा मला सल्ला द्यायचा. तुझा सल्ला मला नेहमीच आवडायचा.

प्रिय...
हल्ली तू माझ्यावर रागावलाय, असं वाटतंय. खरं सांगू...मी तुझ्यावर कधीच रागावलो नाही, रागावू शकत नाही, रागावणारही नाही. किंबहुना, तो माझा हक्कही नाही. हक्कांच्या गोष्टी तशा तू कधीच केल्या नाहीत, हे मला माहित आहे.

प्रिय...
मित्र एकत्र येतात, मैत्री घट्ट होते. नंतर या-ना-त्या कारणाने नाती तोडली जातात, असं मी ऐकलं आहे. पण, तू मात्र तस्सं कधी करू नकोस. माझं बोलणं तुला आवडत नसेल किंवा तुला त्रास होत असेल तर मी तुझ्याशी अबोला ठेवीन. शेवटी, आपली मैत्री चार दिवसांची कधीही नव्हती आणि ती असणारही नाही. मी तुझा होतो, तुझा आहे आणि तुझाच राहणार...पण, मित्रा, मैत्रीचा अंत एवढ्या छोट्या कारणानं नको...मला माहित आहे, ज्या-ज्या वेळी मी चुकतो, त्यावेळी सावरायला तूच असतो नेहमी. मला माहित आहे, तू समजूतदार आहेस. तू समजून घेशील...कारण, तू माझा मित्र आहेस.

फक्त तुझाच....
छोटा दोस्त

Wednesday, 2 March 2011

विठ्ठल माझा...


रात्री उशीराने मी ऑफीसमधून आल्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी उशीरपर्यंत झोपण्याचा माझा इरादा होता. पण, सकाळी दीपक लेंडवेचा फोन आला. विठ्ठल माळीचं निधन झालं म्हणून...माझा विश्वासच बसत नव्हता...मी ते मान्यच करू शकत नाही....आणि आताही ते मान्य करत नाही. खरं तर...विठ्ठल आणि मी तसे शाळेपासून दोस्त....अगदी घट्ट मैत्री...जिवाभावाची...काही खुट्टं जरी झालं तरी तो मला फोन करायचा....खूप वेळ बोलायचा....वेळ नाही मिळाला तर एसएमएस तर आठवणीने पाठवायचा. मग, असा न सांगता तो कसा गेला...हेच मला कळत नाही. मला आठवतंय...मी साधारणतः सहावीला असताना हायस्कूलला आम्ही दोघांनी ऍडमिशन घेतलं. खरं तर विठ्ठलला जिल्हा परिषद शाळेतच शिकावं वाटत होतं. पण, केवळ माझ्या मैत्रीखातर त्यानं हायस्कूलला ऍडमिशन घेतलं. दोघंही एकाच डब्यात जेवायचो. मग, काय, पिठलं-भाकरीही आम्ही चवीनं खायचो. मी दत्ता कुंभार, मधुकर स्वामी, समाधान माळी, चंदू माळी आणि प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या गप्पा रंगायच्या. तासन-तास गप्पांचे फड चालूच राहायचे. अगदी गावापासून ते अमेरिकेतील ग्लोबल वॉर्मिगपर्यत. कोणत्याच विषयाला निर्बंध नसायचे. विठ्ठलसाठी तर कोणताच विषय `वर्ज्य` नसायचा. विठ्ठल बोलण्यापेक्षा युक्ती काढण्यात तसा पटाईत. कोणत्याही गोष्टीवर नामी शक्कल काढण्यात विठ्ठलचा नंबर पहिला असे. विठ्ठलचा स्वभाव म्हणजे सगळ्यांवर प्रेम करणं. खरं तर तो अजातशत्रूच होता. माझ्यावर तर त्याचं खूप प्रेम...का...कुणास ठाऊक...पण, माझी नेहमी बाजू घ्यायचा..खरं तर मला अजूनही आठवतंय. कित्येकदा माझंच चुकायचं...पण, तो मला समजावून माझ्याच बाजूनं उभं राहायचा....
विठ्ठलचा स्वभाव म्हणजे खास वेगळंपण...कोणत्याही विषयावर `लाईटली` घेऊन सर्वांशी मिसळायचा. शाळेत असताना आम्ही खूप खेळलो. विशेषतः क्रिकेट तर पोटभरून खेळलो. क्रिकेट म्हटलं की, विठ्ठल म्हणजे आमच्या टीमचा कायम विकेटकीपर. तो सर्वांची `केअर` घ्यायचा. मित्रांवर खरं प्रेम करणं म्हणजे त्याचा जन्मजात गुणच...कित्येकदा आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी त्याच्या सायकलवर दुसऱ्या ठिकाणी जायचो. विठ्ठल कायमच आमचा सारथी असायचा. क्रिकेटमधले प्लॅन असो किंवा कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्यासाठी विठ्ठल नेहमीच पुढे असायचा. तो सक्सेस व्हायचा....
मला चांगलं आठवतंय...मी दिगंबर भाकरे, संभाजी नागणे, अनिल शिंदे, प्रफुल्ल कुलकर्णी, संतोष लेंडवे आणि बरेच मित्र फिरण्यासाठी कोकणात गेलो होतो. रात्री घाटात असताना प्रचंड पाऊस सुरु होता. घाटात झाड आडवे पडले होते. ते काढण्यासाठी सर्वांची धडपड सुरु होती. आम्ही सगळे जण घाबरलो होतो. पण, विठ्ठल कधीच घाबरत नव्हता. त्याने उतरून दोन किलोमीटरची रांग चालत जाऊन सर्व परिस्थिती पाहिली. त्याने अखेर गर्दीतही गाडीसाठी रस्ता शोधून काढला. आमच्यासाठी तो नेहमीच मार्गदर्शक होता. खूप धडपडी...नेहमी काहीतरी नवीन करण्याचा छंद...अंगात असलेली जिगर...त्यामुळे तो नेहमी यशस्वी व्हायचा.
दिवाळीला सुट्टी मिळाल्याने मी ही गावी गेलो होतो. सगळे मित्र भेटले. छान मैफल रंगली. त्यावेळी विठ्ठल मला भेटला. विठ्ठल भेटला की भरभरून बोलायचा...नेहमी ऐकत राहावे असे वाटायचे. मला तो म्हणाला, अरे मी ट्रॅक्टर घेतला आहे. शेतीची प्रगती छान सुरु आहे. सगळं मस्त सुरु आहे बघ तुझं कसं आहे ते आधी सांग...त्याच्यापेक्षा माझ्याविषयीच तो खूप बोलायचा. आमच्या मित्रांमध्ये सर्वांशी तो मिसळून मनमोकळेपणाने बोलायचा. अशा या माझ्या मित्रानं मला न सांगता सोडून जावं...हे मला पटत नाही. आणि खरं म्हणजे ते विठ्ठलाही पटलं नसतं, हे मला ठाऊक आहे.

Tuesday, 14 December 2010

जिंदादिल दिग्दर्शक-सचिन कारंडे


सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमधील सचिन कारंडे यानं अगदी सहावीत असतानाच दिग्दर्शक होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. म्हणतात ना...बाळाचे पाय पाळण्यात दिसतात...अगदी तसंच ते स्वप्न त्यानं उराशी बाळगलं, आणि ते प्रत्यक्षात आज उतरवलं. सचिननं "पे बॅक' नावाचा हिंदी चित्रपट काढला आहे. त्याचा आज मुंबईत प्रीमिअर होणार आहे. त्याचा हा पहिलाच चित्रपट...शाळेत असताना मनाशी ठरवलेली गोष्ट आज प्रत्यक्षात साकार होताना सचिनच्या डोळ्यात आनंदाश्रु येत आहेत. अहो, स्वप्न म्हणजे काय असतं, ते प्रत्यक्षात उतरवताना काय करावं लागतं, स्वप्न साकार झाल्यावर होणारा आनंद काय असतो, याचं उत्तर सचिनच्या प्रत्येक शब्दातून जाणवते.


सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये सचिन कारंडेचा जन्म झाला. वडील लॉन्ड्रीचा व्यवसाय करतात. घरातील मंडळींचा चित्रपटाविषयी तसा काही संबंध नाही. गुरु वगैरे तस्सं कुणीच नाही. पण, लहानपणापासून सचिनला चित्रपटाची आवड होती. शाळेतील अभ्यासात सचिनने तशी फारशी चमकदार कामगिरी केली नाही. मात्र, चित्रपटातील गाणी त्याची तोंडपाठ असायची. गाणी तोंडपाठ मात्र अभ्यास सपाट असं सचिनचं असायचं. शाळेतील अभ्यासात तसा इतरांपेक्षा फार हुशारही नव्हता, आणि एकदम "ढ' विद्यार्थ्यांसारखाही नव्हता. गणितं, भूमिती किंवा इंग्रजीचा पाठ असला तरी सचिनचं गाणं ठरलेलं असायचं. शाळेत असताना प्र.के.अत्रे यांचं "वेड्यांचा बाजार' हे नाटक पाहिलं. म्हणतात ना...मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. अगदी तस्संच...सचिनला सहावीत असताना दिग्दर्शक होण्याची आवड होती. लहानपण तस्सं खेळायचं...बागडायचं..नाचायचं. पण, या गड्याला चित्रपटाचा भारी नाद...खरंच नाद असल्याशिवाय कुठलाही माणूस धडपडून, झपाटून काम करत नाही, हे सचिनचं पक्कं तर्कशास्त्र. अकलूजच्या सदाशिवराव माने महाविद्यालयात बारावीपर्यंत कॉमर्स शाखेतून सचिननं शिक्षण घेतलं. पुढे त्यानं पुण्याच्या ललित कला केंद्रात प्रवेश घेतला. नाट्यशास्त्रात 3 वर्षे खर्च केल्यावर त्याला खूप काही नवं शिकल्याचं समाधान मिळालं. त्या दरम्यान, त्याने वाचनाचा सपाटा सुरु केला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अच्युत गोडबोले यांची भाषणे ऐकून सचिन भारावून जायचा. त्याची "एनर्जी' एकाच ठिकाणी लागत होती. कुणाला डॉक्‍टर, इंजिनिअर, वकील व्हायचे होते. पण, याच पठ्ठ्याला दिग्दर्शक व्हायचे होते. बॉलीवूडमध्ये नाव कमवायचं असेल तर मुंबईत यायला हवं. यासाठी 2006 मध्ये सचिन मुंबईत आला. त्यानं अनेक कथा लिहिल्या. काही कथा अनुभवातून आल्या होत्या. त्याचं मन स्थिर राहतं नव्हतं. त्या अस्थिर मनातून अनेक कथांचा जन्म होत होता. नवे प्रयोग, नवी गृहितके मांडली जात होती. सचिनने थायलंडमध्ये "फ्लॅश' नावाची एक शॉर्टफिल्म बनविली. त्याला बॅंकाकमध्येही चांगला प्रतिसाद मिळाला. मग, काय सचिनचे एकापाठोपाठ एक प्रयोग होत राहिले. बॅंकाकमधील काही भारतीयांनी...आयडिया अच्छा है सर...म्हणून सचिनला गौरविले. मग काय, सचिनच्या अंगात शंभर हत्तीचे बळ आले. नव्या उमेदीने सचिन कामाला लागला. चुका सुधारून नव्या प्रयोगाची आखणी करू लागला. सचिनच्या आयुष्यात आलेली एक कथा त्याने "पे बॅंक' मध्ये मांडली आहे. "पे बॅक' चित्रपटासाठी तब्बल 5 कोटी रुपये खर्च झाले आहेत. सचिनचा जानेवारीत "विकल्प' नावाचा दुसरा हिंदी चित्रपट येतोय. जिद्दी आणि जिंदादिल दिग्दर्शक असलेल्या या मराठमोळ्या दिग्दर्शकाला अर्थात सचिनला त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा...

Thursday, 26 August 2010

मीडिया (LIVE)


एका शेतकऱ्याची आत्महत्या....खरं तर...प्रसारमाध्यमांसाठी ही एक छोटीशी बातमी. रोजच्या बातम्यांसारखीच... या बातमीचे गांभीर्य किंवा महत्त्व फॅशन शोच्या बातमीपुढे सर्वांनाच फिके वाटते. सर्व प्रसारमाध्यमांची शक्ती हल्ली फॅशन शो कडे लागली आहे. प्रिंट मीडियातही यांना आता पहिल्या पानावर स्थान मिळतंय. इलेक्ट्रॉनिक माध्यमांतही ही बातमी दाखविल्याशिवाय बुलेटिनच संपत नाही. पण, फॅशन शोच्या बातमीभोवती आपली शक्ती खर्ची होताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारख्या बातमीकडे आपले दुर्लक्ष होते. अहो, म्हणजे, होणारच...त्यात काय एवढं...तुम्ही काय नवीन सांगता..? त्याला कुठे वाचकवर्ग आहे का..? अहो, कडक आणि टंच हिरॉईनचे फॅशन शो पाहण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी कोण वाचेल किंवा कोण पाहील. म्हणजे तेवढा टीआरपी पण मिळणार नाही ना. ? कोणत्या जगात आहात तुम्ही, वस्तुस्थितीचा विचार करा...वाचकांना आणि प्रेक्षकांना काय लागतं माहित आहे का तुम्हाला..?.(जणू काही यांनी प्रत्येक वाचकांना किंवा प्रेक्षकांना विचारून प्रत्येक बातमी ठरविली आहे.) अर्धनग्न किंवा हिरॉईनचे टंच फोटो दाखवले तर कुणाला नाही आवडणार...? ही साधी बाब आहे. त्यात कुठला आलाय रिसर्च. पण, हे ऐकणार कोण..? मुळात माध्यमांची भूमिका काय...हा प्रश्न पडतो. पत्रकारितेच्या वर्गात शिकत असताना माध्यमांची कर्तव्ये काय..? हे शिकलो होतो. पण, दुर्दैवानं पुस्तकातच ती माहिती राहते की काय..? अशी शंका कधी-कधी येते. मुळात पत्रकारितेच्या वर्गात शिकणे आणि प्रत्यक्ष कामाचा कसलाही काडीमात्र संबंध नाही, असाच बहुतांश पत्रकारांचा समज झाला आहे. अहो, इथं कोणतीही हेरॉल्ड लॉस्वेल, डॅनियल लर्नर, एव्हर्ट रॉजर्सची कम्युनिकेशन मॉडेल्स चालत नाहीत..? इथं फक्त रॅम्पवरची मॉडेल्स चालतात..ती व्य़ाख्या वगैरे `डिबार` (हद्दपार) झाली आहे. मग, प्रश्न पडतो तो काय शिकलो त्याचा....
परवा पिपली (लाईव्ह) चित्रपट पाहिला. खरोखरच माध्यमांविषयीचे वास्तव दर्शन या चित्रपटात दाखविले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या..हा गंभीर विषय आहे. पण, माध्यमांवर या चित्रपटात टीका करण्यात आली आहे. चित्रपट एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. पण, त्यामागची माध्यमातील भूमिका सर्वांसमोर येते आहे. ती काही अंशी खरी आहे. हल्ली, ग्रामीण भागातील विषय म्हणजे माध्यमांना चेष्टेचा विषय वाटतो. अहो, रान, वनं दाखवून कुठे टीआरपी वाढतो का..? अहो...बॉलीवूडच्या स्टोरी दाखवा. बघा..टीआरपी कसा वाढतो ते, हे फंडे सांगणारे अनेकजण आहेत. पण, ग्रामीण भागातील प्रश्न मांडण्यासाठी ते सोडविण्यासाठी माध्यमे किती महत्त्व देतात, हा संशोधनाचा विषय आहे. विकास वार्तांना हल्ली माध्यमांमध्ये हवे तेवढे स्थान मिळत नाही. समाजाच्या विकासाला प्रेरक बातम्या दाखविल्या जात नाहीत. किंबहुना त्या पाहिल्या जात नाही, किंवा त्यामध्ये फार `दम` नाही, असंच सर्वांना वाटतं. लव्हस्टोरी असलेले सर्वच चित्रपट चालतात, असं काही नाही. तर पिपली लाईव्हसारखे सामाजिक चित्रपट वेगळ्या धाटणीने मांडला की तो सर्वांना आवडतो. मग, शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळ्या धाटणीने पत्रकारांनी मांडले तर ते लोकांना का आवडणार नाहीत, याविषयी गांभीर्याने विचार करायला हवा.

केवळ एक, दोन लेख लिहून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय संपणारा नाही, त्यासाठी खोलवर जाऊन अभ्यास करायला हवा. माध्यमांनी किती गांभीर्याने हा विषय हाताळला हा संशोधनाचा विषय आहे. वृत्तपत्रात सिंगल कॉलम नाहीतर सजलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया (हल्ली दृकश्राव्य माध्यम हा शब्द खूपच सपक वाटतो.) तर हा विषय खूप चेष्टेचा वाटतोय. अहो, `टीआरपी`च्या नशेत अडकलेले जरा `कडक`, `हॉट` काहीतरी दाखवा, अशी आरडाओरड करणारे, आपण जगावेगळे काहीतरी करतोय, असा अविर्भाव करणारे सगळीकडेच आहेत. पण, मला एक गोष्ट कळत नाही, ग्रामीण भागात ७० टक्के लोक राहतात. मग, सर्व बातम्या शहरी भागातील लोकांसाठीच का असतात..? निवडणुकीतही लोकसंख्येवर आधारित मतदारसंघ ठरतो. त्यानुसार प्रश्न ठरतात. मग, ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न, समस्या माध्यमात का उमटत नाही. त्यांना प्रश्न नाहीत का..? त्यांना माहितीची गरज नाही का..? कशासाठी माध्यमांचा उपयोग होतोय..? कोण उपयोग करतोय माध्यमांचा..? याची सगळी उत्तरे निरुत्तरीत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, विकासाचे प्रश्न माध्यमांत मांडणे ही फक्त सरकारी माध्यमांची जबाबदारी आहे, ते आपले `बीट` नाही. किंबहूना त्यात नवीन ग्लॅमर, थ्रीलर आणि आक्रमक असे काहीच नाही. त्यामध्ये पत्रकाराला फार प्रसिद्धी मिळत नाही, असे पत्रकारांना वाटत असावे. मात्र, एखादाच पी. साईनाथ सारखा पत्रकार उठतो, त्याच्याविषयी लिहितो. पी. साईनाथ यांनी भारताच्या ग्रामीण भागांतल्या दारिद्य्राचा अभ्यास केला. त्यांचे भारतीय दारिद्य्राबद्दलचे संशोधन जगभर गाजले. ग्रामीण भागांतील शोषित, वंचितांचे जीवन हे पी. साईनाथ यांच्यासाठी केवळ संशोधनाचा नव्हे, तर चिंतनाचा विषय आहे. याच भूमिकेतून त्यांनी ""Everybody Loves a good drought'' हे पुस्तक लिहिले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर डॉ. नरेंद्र जाधव यांनी आपले विचार मांडले. विचारांमध्ये मतभेद असले तरी प्रश्न सर्वांसमोर येतोय, हे माध्यमांचे यश नाही का..?

पण, रंगीन बॉलीवूडच्या बातम्यांमध्ये आणि रॅम्ववरच्या मॉ़डेल्सच्या बातम्यांमध्ये गुंतलेल्या पत्रकारांना हे सर्व हास्यास्पद वाटेल. किंबहूना त्यांना ही वायफळ बडबड वाटेल. जे खपतं तेच आम्ही विकतो, हे त्याचं `पर्मनंट` उत्तर ठरलेलं आहे. त्यांना त्या बातम्यांमध्ये अडकवलं जातंय. ते तर काय करणार `बिच्चारे...`. अहो, पत्रकारितेच्या वर्गात शिकताना खूप काही शिकलेलो असतो. पण, प्रत्यक्ष काम करताना कळतं तुम्हाला किती `स्वातंत्र्य` आहे ते..फक्त बोलणं सोप्पं असतं हो...काम करताना कळतं ते....आपण फार पारतंत्र्यात आहोत, असे काही नाही. पण, आपल्याला जे मांडायचं आहे, तेच राहून जातं. मग, आपण बनतो तो फक्त स्टेनोग्राफर आताच्या पिढीतील ठेवणीतला कॉम्प्युटर टाईपरायटर...

ग्रामीण भागातील विकासासाठी माध्यमांनी आता पुढाकार घ्यायला हवा. प्रसारमाध्यमांमध्ये कुठेही नैतिकतेचे भान दिसत नाही. फक्त पेज थ्रीच नाही, तर पेज एक ते चोवीस असा संपूर्ण पेपरच पेज थ्री आहे. स्पर्धेच्या युगात किंबहुना माध्यमांची ती आता गरज बनली आहे. पैसे देऊन अख्खं पान भरून हवा तो मजकूर छापणारे किंवा `प्राईम टाईम`चा स्लॉट विकत घेऊन हवं तस्सं दाखविणाऱ्या जाहिरातदारालाच आता महत्त्व आलंय. प्रसारमाध्यमातील लोकांना सामान्य जनतेचे, त्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्‍नाचे आकलनच दिसत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

एक्सक्लुजिव्ह, स्पेशल, इम्पॅक्ट, दणका, परिणाम नावाखाली आम्हीच सर्वांच्या पुढे...हे दाखवितात. सर्वप्रथम आम्हीच..क्रेडिट घ्यायला हरकत नाही. पण, सर्वजण ते आम्हीच प्रथम कसे, याचा डांगोरा पिटतात. सगळेच कसे पहिल्या नंबरचे असतील, याचं कोडं मला अजून उलगडलं नाही. यांच्यापेक्षा आमच्या गावातला दवंडी पिटणारा रामा मला खरा बातमीदार वाटतो. गावातील बित्तंबातमी तो सर्वांपर्यंत पोहोचवतो. लोकांच्या मदतीला येतो, तोच मला खरा विश्वासार्ह वाटतो.

भारत हा कृषिप्रधान देश आहे, हे आपण सर्वजण मानतो. मग, बातम्यांमध्ये ग्रामीण भागातील आणि शेतीविषयीच्या कितपत बातम्या येतात. प्रत्येक बुलेटिनला बॉलीवूडच्या हेडलाईन्स `कंपल्सरी` असाव्यात, असा आग्रह धरणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या किंवा ग्रामीण भागातील प्रश्नांविषयी हेडलाईन का करावीशी वाटत नाही..? अहमदनगर, सोलापूर, नांदेड, जळगावबरोबर संबंध महाराष्ट्रात खतांच्या टंचाईवरून हाणामारी सुरु आहे. पण, फॅशनच्या बातमीपुढे शेतकऱ्यांच्या बातमीला `न्यूजव्हॅल्यू` ठरत नाही, याचे आश्चर्य वाटते. बातमीदार म्हणून बॉलीवूडच्या बातमीची `व्हॅल्यू` मी नाकारत नाही. पण, शेतकऱ्यांच्या खतांची बातमी `आऊटडेटेड` कशी होते, हेच मला कळत नाही. इतके आपण बोथट झालो आहोत का..? भावनाशून्य...कोरडे...अगदी शुष्क वाळवंटासारखे...

बातमी नसतानाही त्याला मिर्च मसाला लावून बातमी बनविणारे `कारखाने` आहेत. सलमान ज्या-ज्या हिरॉईनबरोबर काम करतो. ती हिरॉईन पुन्हा फ्लॉप गेली आहे. असा तर्क काढून सलमान `लकी` की `अनलकी` ठरविणारे आहेत. इथं मी दोष फक्त पत्रकारांना देत नाही. संबंध यंत्रणेला...नव्या परिभाषेत या `सिस्टीम`ला. ज्यांनी `टार्गेट` ओरिएंटेड पत्रकारितेचे व्रत घेऊन पत्रकारिता सुरु केली. त्यांच्याविषयी मी बोलतो आहे. आपण सारे भोई...फक्त वाहक...गाड्या हाकण्यासाठी...आपण काही बोलू शकत नाही...मांडू शकत नाही...ही मोठी पत्रकारांची शोकांतिका आहे. पत्रकार कुणाविषयीही लिहू शकतो. पत्रकारांना खूप स्वातंत्र्य असते. वगैरे...वगैरे....पण, अंधारात सर्वांना प्रकाश देणाऱ्या दिव्याखाली तर कुठे असतो प्रकाश...होय ना...इथं तर मोठी गोम आहे. मी `निगेटिव्ह` विचारांचा मुळीच नाही. काही माध्यमे याकडे तितक्याच बारकाईने पाहतात, हे मी जाणतो आहे. पण, त्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतपत आहे. परिवर्तन करायचे असेल तर मुळापासून घाव घालायला शिकले पाहिजे, हे आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून शिकलो आहोत.

आजही माध्यमांमध्ये ग्रामीण भागातील गोरगरिबांचे, दीन दलितांचे, उपेक्षित घटकांचे प्रश्न मांडले जात नाहीत. किंबहूना त्यांचे प्रश्न मांडणारा `तिथं` माणूस नाही का? असा प्रश्न पडतो. पॅकेज पत्रकारिता करणाऱ्यांना हे विचार मुळीच पटणार नाहीत. किंबहुना त्यांना हे प्रश्न `शिवत`ही नाहीत. पण, माध्यमांनी याचा गांभीर्यानं विचार करायला हवा नाहीतर काही दिवसांनी हीच पत्रकारिता `हद्दपार` होईल, ही भीती आहे. पूर्वी `समाजाचे प्रश्न मांडणारी पत्रकारिता असायची` असा इतिहास पुढील पिढीसमोर सांगितला जाईल. पण, मी जे बोलतो आहे ते काहींना सारी स्टंटबाजी, भाषणबाजी, दिखाऊपणा वाटायला लागतो. खरंही आहे म्हणा...आपल्या व्यावसायिक पत्रकारितेने आपल्याला हेच `बाळकडू` (`बाळगोड` म्हणायला हवे खरे) दिले आहे. त्यामुळे त्याचं हेच GENNEXT आहे, हे मानायलाच हवे.

समाजातील दुर्बलतेकडे निर्देश करते ती खरी पत्रकारिता, अशी पत्रकारितेची सरळसोपी व्याख्या पी. साईनाथ करतात. गरिबांचे अधिकार आणि त्यांच्या हक्कांविषयी सजगतेने वृत्तपत्रांमध्ये अधिक वृत्तांत यावेत, अशी अपेक्षा पी. साईनाथ यांची असते. मला माहित आहे, मी काही बोलतो आहे ते तुम्हाला माहित नाही, असे नाही. ते तुम्हीही चांगले जाणून आहात. मी स्पष्ट बोलतो आहे. यातून काहीही साध्य होणार नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर तस्सं प्लीज समजू नका. समाजातील आपण एक भाग म्हणून ग्रामीण भागातील विकासासाठी आपण सुरवात करुया...अस्सं म्हणतोय...हे लक्षात घ्या...तर मग, चला पेन उचला...

Tuesday, 12 January 2010

आधुनिक चित्रकलेतील एकलव्य : शशिकांत धोत्रे

































शाळेतील मधल्या सुट्टीत लगोरी, कंचे हे खेळ मनसोक्त खेळणं, सवंगड्यांसोबत मधाच्या पोळ्यांना दगड मारून पाडणं, हे ग्रामीण भागातील मुलांच्या आवडीचे खेळ. बालवयातला हा खोडकरपणा तरुणपणी आठवतांना गप्पा रंगतात. पण, त्या तात्पुरत्याच...मात्र, शशिकांत धोत्रे याने त्या आठवणी कायमस्वरुपी कागदावर कोरून ठेवल्या आहेत. केवळ पेन्सिलच्या साहाय्याने शशीने अप्रतिम चित्र रेखाटली आहेत. कंचे खेळणारा मुलगा, नऊवारी साडीतील सुंदरी, मधाचं पोळं यासारखी चित्रं मन वेधून घेतात. ही गावरान कला शशीने चित्रांबरोबर हृदयातही कोरून ठेवली आहे.
शशीने ग्रामीण जीवनावर काढलेल्या चित्रकृतींना नऊ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत. शशी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावचा. अवघ्या पाच हजार लोकवस्तीचं असलेलं त्याचं हे छोटं गाव. घरात अठराविश्व दारिद्र्य पाचवीला पुजलेलं. वडार समाजात जन्माला आल्यामुळे वडील दगड फोडण्याचं काम करतात. आई मोलमजूरी करून कुटुंब चालवते. शशी लहानपणी शाळेतील भिंतींवर चित्रं काढायचा. अभ्यासात तसा फार पुढे नसायचा. पण, चित्रकलेत त्याला विशेष रस होता. शशी शाळेतील भिंती रंगवून टाकायचा. कित्येकदा, याबद्दल शशीनं शिक्षकांचं बोलणंही खाल्लं आहे. शेवटी कंटाळून शिक्षकांनी शशीच्या आईला सांगितले. शशी अभ्यासापेक्षा शाळेतल्या भिंतीवर चित्र काढून भिंती खराब करतो. पण, म्हणतात ना..मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तसंच झालं...शशीने आपली चित्रकला कायम जिवंत ठेवली. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने पुढे ऍनीमेशन करण्याचा निर्णय घेतला. पण, शिक्षणासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. मोहोळ तालुक्यातील शेटफळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते विजयराज डोंगरे यांनी त्याला बोलावून १५ हजार रुपये दिले. त्याची आठवणही शशी मुद्दाम सांगतो. त्यानंतर शशीने मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला खरा. पण, तिथेही त्याचं मन रमेना. घरात पडलेल्या काळ्या कागदावर शशीने अप्रतिम चित्र रेखाटले. त्याच चित्राला शशीला आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. त्यामुळे शशीचा उत्साह वाढला. त्यानंतर त्याने अनेक चित्रे रेखाटली.

रंगीत पेन्सिलच्या साहाय्याने काळ्या कागदावर चित्रकला करणारा शशी बहुधा पहिलाच चित्रकार आहे. झाडावरून सफरचंद नेहमी खालीच का पडते, याचा विचार करून न्यूटननं जसा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. तसाच शोध शशीने आपल्या चित्रकलेत लावला आहे. लंडनला जूनमध्ये होणाऱ्या चित्रप्रदर्शनात जगातील चार आंतरराष्ट्रीय चित्रकारांत शशीला निमंत्रण देण्यात आले आहे.

मुंबईत असला तरी शशीच्या प्रत्येक चित्रकलेत `गावाकडच्या` मातीचा सुगंध आहे. शाळेत कंचे (गोट्या) खेळणारा गफार त्याला अजूनही आठवतोय. मधाच्या पोळ्याला दगड मारून खाल्लेल्या मधाची गोडी आजही त्याच्या जिभेवर आहे. त्याने तोच गंध आणि सुगंध अत्तराच्या कुपीसारखा चित्रावर रेखाटला आहे.

चित्रकलेत शशीचा तसा कुणी मोठा गुरु नाही. ना कुणी मार्गदर्शन केले. शशी स्वतःच गावाकडच्या कल्पनेत रमतो. कल्पना प्रत्यक्षात कागदावर उतरवतो. शशीचा कुणी द्रोणाचार्य नसला तरी शशी खरा आधुनिक युगातील एकलव्यच आहे.

शशीच्या चित्रप्रदर्शनाला अभिनेता जॅकी श्रॉफनेही भेट दिली. चित्रे पाहून जॅकीदादाही आपल्या बालपणातील आठवणीत अक्षरशः रमून गेला. वाह....भिडू..., एकदम झक्कास...अशी तरतरीत मराठीत दादही दिली.

म्हणून मला सांगावंसं वाटतं की, तुम्ही मोठ्या शहरातून आला की छोट्या गावातून....यातून कोणी मोठा होत नसतो. किंबहुना, मोठेपणाचा हा मापदंडही ठरू शकत नाही. उलट, तुम्ही कुठून येऊन किती मोठे काम केले आहे. यातच खरा मोठेपणा दडला आहे. पण, यासाठी हवी प्रखर इच्छाशक्ती, महत्त्वकांक्षा आणि जिद्दही...!