Wednesday, 11 March 2009

नात्यापल्याडची नाती...


मैत्री...जीवापाड जपलेलं घट्ट नातं. कधी आधार वाटतो, कधी सोबत तर कधी खूप काही काही...खरंच काय असतं त्यात...समजलं तरी अजून तितकसं उमगलं नाही. मला आठवतेय ती मैत्री लहानपणीची. त्या शाळेतील श्याम अजूनही आठवतोय. मी पहिलीत असेन त्यावेळी मी कृष्णाचं गीत गायचो. तस्सं मी म्हटलेलं गीत मला नीटसं आठवत नाही. परंतु, वर्गातील मुलं त्या गीतांवरून मला चिडवायची. जिल्हा परिषदेच्या शाळेत गारवेलच्या झाडाखाली श्याम आणि मी जेवायचो. शाळेसमोरच्या हातपंपाला मान खाली घालून गुरांसारखं पाणी प्यायचो. त्यातला आनंद वेगळाच. कधी रानात भटकायचो. सुईनकिडा (सोनेरी रंगाचा किडा) मला खूप आवडायचा. मी आणि श्याम सुईनकिड्याला काडीपेटीच्या बॉक्समध्ये बंद करून त्याला पाला भरवत असे. का कुणास ठाऊक, त्यातला आनंद निराळाच. शाळेत असताना मी खूप क्रिकेट खेळलो. तसा हा खेळ मला मनापासून आवडायचा. यासाठी मी कित्येकदा घरच्याकडून बोलणी खाल्ली. तापलेल्या उन्हात क्रिकेट खेळायचो. मग, कसली आलीय, जेवणाची भ्रांत ना पाण्याची. अगदी पोटभर क्रिकेट खेळायचो.


मनातलं सारं...सारं..सारं काही आपण मित्राशी `शेअर` करतो. सहवासातून मैत्री रुजते हे मी मान्य करतो. परंतु, सहवास म्हणजे मैत्री नव्हे. कित्येकदा वर्गात इतकी मुलं-मुली असतानासुद्धा आपली मैत्री `त्याच्याशी` किंवा `तिच्याशी`च होते. अस्सं का? याचं उत्तर अजून मला मिळालं नाही. कित्येकदा कितीही जुळवून घेतलं तरी पुन्हा तुटतंच. मैत्री ही काही ठरवून करायची गोष्ट नव्हे, तर ती आपोआप होते. एकमेकांबद्दल आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा वाटतो. मला तर वाटतं, मैत्रीच्या काही खास waves (लहरी) असाव्यात. त्यामुळं ही मैत्री होते, वाढते आणि निरंतर फुलत राहते.

Monday, 16 February 2009

दिल से...


व्हॅलेंटाईन डे...तमाम प्रेमीयुगुलांचा हक्काचा प्यार डे...आपल्या प्रिय व्यक्तीला कुणी प्रेमाचा गुलाब देणार तर कुणी प्रेमपत्र देणार...कुणी प्रेयसीला किस करणार तर कुणी मिस करणार...कॉलेजच्या कट्ट्यावर बसून बर्‍याच जणांचे प्रेमपाठ सुरु असतात. त्यात कुणी यशस्वी होतं. तर कुणी अयशस्वी. मुळात काहींचा नेहमी जिंकणं हा हेतूही नसतो. कधी-कधी जिंकण्यापेक्षा हारण्यातही त्यांना जिंकणं वाटतं. कुणावरही प्रेम करणं, हा काही अपराध नाही. आपल्या मनातल्या भावना जर आपल्या प्रिय व्यक्तीजवळ दिलखुलासपणे मांडल्या तर त्या स्वीकारणं ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतात. सागरकिनारी मारलेल्या मनसोक्त गप्पा, कधी हळूच गोड गुपित सांगितलेली गोष्ट, एकमेकांच्या साक्षीने घेतलेल्या आणाभाका आणि सतत हवाहवासा वाटणारा सहवास प्रत्येकानं कधीतरी अनुभवलेला असतो. प्रेम किती हार्ट टू हार्ट आहे, हे सांगण्यासाठी नदीकिनारी वाळीत नाव लिहिणं, गावच्या जत्रेत हौसेखातर हातावर नाव गोंदणं. कधी पिकनिक स्पॉटवरच्या दगडांवर तर कधी एसटीच्या बाकड्यावर तिचं नाव कोरलं जातं. इतरांच्या दृष्टीने तो वेडा असला तरी त्याला वेडेपणातच शहाणपणा वाटतो. सगळ्यांच्या प्रेम व्याख्याही जरा हटकेच. एकमेकांना मनापासून आवडणं. त्याची किंवा तिची प्रतिमा डोळ्यात साठवणं. हृदयात जागवलेली प्रीत नव्यानं जगण्याची उमेद देते. स्वप्नांचं भावविश्व अनेक रंगांनी भरलं जातं, विस्तारलं जातं. सरलेल्या दिवसातल्या उरलेल्या आठवणी मग ताज्या होतात. डायरीची पानं वार्‍याच्या झुळकीनं फडफडायला लागतात तशी उलगडायलाही लागतात. प्रेम हे अमूल्य आहे. प्रेमाला आंधळं म्हटलं जात असलं तरी ते डोळसपणे करायला हवं. मनातलं बोलता आलं नाही म्हणजे प्रेम नाही, असं थोडंच आहे.
प्रेमानं आपल्या जगण्याला नवा अर्थ येतो, हे मान्य आहे. आपण प्रेम करतो, हे जगाला दिसावंच अशा डे संस्कृतीचा हट्ट धरण्याची गरजच? परंतु, जर या निमित्तानं आपली प्रिय व्यक्ती सुखी राहत असेल तर हा निश्चय केला पाहिजे. तिच्या सुखदुःखात सहभागी झालात तर प्रेम सदैव पवित्र आणि अतुट राहील, यात शंका नाही.

Monday, 2 February 2009

मज रुप दाखवा...

विठ्ठलाच्या नामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने चाललेले लाखो वारकरी सावळ्या विठोबाचे रुप पाहण्यासाठी आसुसलेले असतात. दर्शन रांगेत जवळ जवळ बारा तास थांबून ज्यावेळी ते या विश्वरूपी विठोबाला पाहतात. त्यावेळी त्यांच्या मनाचे विश्वरूप झालेले असते. या विठठल भक्तीच्या चंद्रभागेत सर्वांनी पवित्र होऊया.....विठठल विठठल विठठल विठठल विठठल........
चोखामेळाच्या अस्थी घेऊन जाताना नामदेव महाराज पंढरपूर रस्त्याला ज्या दोन ठिकाणी विश्रांती घेतली त्या दोन्हीही ठिकाणी विठठलाच्या पादुका आहेत. त्यापैकी एक एकलासपूरच्या जरा पुढे विसावा म्हणून आणि दुसरे मंगळवेढ्यापासून तीन किलो मीटर अंतरावर महादेवाच्या मंदीराजवळ. पूर्वी मंगळवेढ्यातील बरेच लोक पंढरपूरची पायी वारी करायचे, आज ही करतात. पण ज्यांना शक्य होत नाही ते लोक या पादुकांचे दर्शन घेतात. त्यामुळे मंगळवेढ्यात महादेवाच्या मंदिराकडे भाविक भक्तांची रांग असते. आता तर याला एका सहलीचे रुप आले आहे. लहान मुले, वृध्द मंडळी, स्त्रिया हे सगळेजण फराळ घेऊन या ठिकाणी विठ्ठ्लाच्या पादुकाचे दर्शन घेतात आणि आपली वारी पूर्ण करतात.

Wednesday, 28 January 2009

मी मंगळवेढेकर


संत बसवेश्वर, चोखामेळा, दामाजी, कान्होपात्रा, स्वामी समर्थ आदी सज्जनांच्या वास्तव्याने पावन झालेले मंगळवेढे. प्रतीशिवाजी नेताजी पालकरांचा पराक्रम झेललेली मंगळवेढ्याची भूमी. ब्रह्मदेवाची मूर्ती असलेल्या जगातील अवघ्या तीन स्थानांपैकी एक मंगळवेढे. ज्वारीचे कोठार म्हणून उभ्या महाराष्ट्रात ख्याती असलेले मंगळवेढ्याचे शिवार. याच शिवाराने विठोबाच्या पंढरीला जगवल्याचा इतिहास आहे. महादेवाचे हेमांडपंथी मंदिर, मुरलीधराचं देऊळ, एकवीरीचा माळ, गैबीपीर, कृष्ण तळं, दामाजीचा आड, कुंभार तळं, मारूतीचं पटांगण, खंडोबाचं राऊळ...म्हणजे मंगळवेढे. त्याच्या चतुःसिमांचे रक्षण करण्यासाठी कोणे एकेकाळी अकरा बुरुज छाती काढून उभे असायचे. संपन्न बाजारपेठ या लौकिकाचं आपलं गाव कालौघात कधीतरी विस्कटलं. गावाचं देखणेपणं उणावलं. माझ्या स्मरणातील मंगळवेढे कदाचित रम्य नसेलही. परंतु, भव्य परंपरा लाभलेले मंगळवेढे माझी मातृभूमी आहे. याच अतूट नात्यात मी गुंतलो आहे. जगण्याची लढाई लढताना हे माझं गाव आज तुटलं असलं तरी माझी नाळ मात्र मंगळवेढ्याशी कायम जोडलेली आहे हे मात्र नक्की. पत्रकारितेतील आमचे मित्र समीर इनामदार, मंदार जोशी, सुकृत करंदीकर हे ही याच भूमीतली, याचा मला अभिमान आहे.