Thursday 5 November 2009

अनाथांचा नाथ.....पी.साईनाथ




आपण नेहमी अनेक जणांना भेटतो, पाहतो, बोलतो. पण, त्यातील काही माणसे आपल्या मनात नेहमी घर करून राहतात. का कुणास ठाऊक, अशा काही माणसांशी माझी WAVELENGTH जुळते, अशी माणसे मला नेहमीच ENERGETIC वाटतात. त्यांचा सतत सहवास घडावा, संवाद वाढावा, असंच मला वाटतं. त्यातली एक व्यक्ती म्हणजे पी. साईनाथ. पत्रकारितेचे धडे गिरवत असताना पी.साईनाथ यांच्याबद्दल खूप काही ऐकले होते. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची कधी वेळ आली नाही. पण, ती संधी परवा आली. त्यांनी मला थेट त्यांच्या घरीच बोलावलं. तीन खोल्यांचा फ्लॅट. त्यातल्या दोन खोल्या पुस्तकांनी गच्च भरलेल्या. घरात पुस्तके राहतात की माणसे? असा प्रश्‍न मला पडला. पण, सतत वाचन आणि चिंतन करणं हा जणू पी.साईनाथ यांचा स्थायीभावच असावा. पत्रकारितेच्या वर्गात शिकत असताना पी.साईनाथ यांच्या विकास पत्रकारितेवरील लेख मी वाचले होते. त्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागातील शोषित, वंचितांचे जीवन पी.साईनाथ यांनी मांडले होते. हा त्यांच्या संशोधनाचा विषय नव्हता तर चिंतनाचा विषय होता, हे मला दिसून आले. त्या अनुषंगाने मी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनीही विविध विषयांवर अगदी खुलेपणाने चर्चा केली. ग्रामीण पत्रकारितेपासून ते अगदी आताच्या पॅकेज पत्रकारितेबद्दल त्यांनी सडेतोड मते मांडली. पी. साईनाथ हे माजी राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांचे नातू. पण, ती ओळख ते मुद्दामहून सांगत नाहीत. गोरगरिबांसाठी, उपेक्षित दलित, आदिवासी, कष्टकरी, महिला यांचे प्रश्‍न पोटतिडकीनं मांडले पाहिजेत. दलित, आदिवासी आणि महिलांना समाजात स्थान मिळाले पाहिजे. जातीयवाद नष्ट झाला पाहिजे. दलितांना हक्काची जाणीव करून दिली पाहिजे, तरच सामाजिक बदल होतीलही त्यांची आग्रही भूमिका. व्यावसायिक स्पर्धेच्या युगातही त्यांची भूमिका स्पष्ट, स्वच्छ आणि निर्भेळ आहे. पी. साईनाथ ह्युमन इंटरेस्ट असणाऱ्या स्टोरीजमध्ये ते अन्यायग्रस्त लोकांच्या गोष्टी लिहीत नाहीत तर त्या गोष्टीमधील लोकच आपल्याशी बोलत असतात, असं ते म्हणतात. त्यांच्या प्रत्येक रिपोर्टमध्ये मला रिसर्च क्वालिटी दिसली. मुळात पी. साईनाथ सत्याचा आग्रह धरणारे आहेत. त्यांच्या बोलण्यातून कुठेही आक्रस्ताळेपणा दिसला नाही. त्यांची बोलण्याची शैली शांत, गंभीर, टीका करणारी अभ्यासपूर्ण अशी मांडणी करणारी आहे. विषयाच्या मुळाशी जाऊन विषयाचा तळ गाठण्याची हातोटी आहे. निवडणुकीत झालेल्या पॅकेज पत्रकारितेबद्दल ते तीव्र नापसंती व्यक्त करतात. मी त्यांना प्रसारमाध्यमांची सामाजिक भूमिका बदलत चालली आहे का? असे विचारल्यावर ते म्हणाले, ""प्रसारमाध्यमांमध्ये नैतिकतेचे भान दिसत नाही. पेज थ्रीच नाही तर पेज एक ते चोवीस असा संपूर्ण पेपरच पेज थ्री आहे. माध्यमांना सामाजिक भान आहे की नाही, असा प्रश्‍न पडतो. Medium,messageआणि money या त्रिसुत्रीचा वापर निवडणुकीत कसा झाला हे त्यांनी सांगितले. थोर विचारवंत मार्शल मॅकलुहान म्हणतो, Medium Is the message (माध्यम हाच संवाद आहे.) पण, माध्यमातून कोणता संदेश दिला जातो, याचाही अभ्यास व्हायला हवा, असा साईनाथ सांगतात. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा पी. साईनाथ यांनी त्या-त्या गावात जाऊन अभ्यास केला आहे. त्यानंतर त्यांनी अभ्यासपूर्ण निरीक्षण नोंदवलंय. आपल्याला गवसलेले प्रश्‍न सरकारचा रोष ओढवूनही ते जाहीररित्या सांगतात, हे विशेष. जनतेला फक्त प्रश्‍नांचे गांभीर्य सांगतात असे नव्हे, तर त्याविरुद्ध सर्वसामान्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवली पाहिजे, ही भूमिकाही घेतात. आपण लिहिलेली बातमी ज्या समाजघटकांची आहे. तो समाज ती बातमी वाचणारही नाही, त्याची साधी प्रतिक्रियाही आपल्याला मिळणार नाही, याची कल्पना असूनसुद्धा उपेक्षितांची बाजू मांडली पाहिजे. हे काम पत्रकारितेतील व्रत म्हणून ते करतात. समाजातील दुर्बलतेकडे निर्देश करते ती खरी पत्रकारिता, अशी सरळसोपी व्याख्या पी. साईनाथ करतात. गरिबांचे अधिकार आणि त्यांच्या हक्कांविषयी माध्यमांमध्ये अधिक वृत्तांत यायला हवा, अशी अपेक्षा ते बोलून दाखवितात. माध्यमे बातम्यांकडून आता करमणुकीकडे वळू लागली आहेत. त्यामुळे सामाजिक बांधिलकीची पत्रकारिता हरवत चालली आहे. सामान्यांचे प्रश्‍न माध्यमांत उमटत नाहीत. तुम्ही मला सांगा, भारत हा कृषिप्रधान देश आहे, असं आपण म्हणतो, कृषिविषयक किती बातम्या माध्यमात दिसतात? कृषी क्षेत्राच्या बातम्या देणारे पूर्णवेळ किती बातमीदार आहेत? राजकारण, इंटरटेनमेंट, स्पोर्टस बीट पाहणारे पत्रकार आहेत, मग कृषी बीट पाहणारा बातमीदार का नाही? धांगडधिंगा करणाऱ्या कार्यक्रमाला "स्पॉन्सर' मिळतो म्हणून मीडिया पार्टनर म्हणून माध्यमे मिरवतात. शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासी आणि उपेक्षित घटकांचे प्रश्‍न महत्त्वाचे नाहीत का? या बातम्यांना "स्पॉन्सर' मिळत नाही म्हणून या घटकांच्या बातम्या दाखवायच्या नाहीत का? एकता कपूरच्या मालिकांमध्ये विवाहबाह्य संबंधाविषयी दाखविले जाते, मग टी.व्ही.चा टीआरपी वाढतो. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न माध्यमांना गंभीर कसा वाटत नाही? याचे मला आश्‍चर्य वाटते. शेतकऱ्यांना पॅकेज दिले म्हणजे प्रश्‍न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांना ओपन हार्टची गरज आहे. त्यांना पॅकेज देऊन बॅंडेज लावले जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत कायमस्वरुपी उपाययोजना व्हायला हवी. कार्पोरेट क्षेत्राला मोठे कर्ज दिले जाते. मग, शेतकऱ्यांना कमी दराने कर्ज का दिले जात नाही? पेट्रोलचे भाव वाढवता ना, मग शेतकऱ्यांच्या धान्याला भाव देणार की नाही? म्हणून शेतकऱ्यांसाठी प्राईस स्टेबिलेशन फंड द्यायला हवा. शेतकऱ्यांच्या धान्याला निश्‍चित आणि योग्य दर मिळाला पाहिजे, तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असं साईनाथ सांगतात. शेअर मार्केट, रिलायन्स मार्केट नको आता शेतकऱ्यांचे मार्केट झाले पाहिजे हा व्यापक दृष्टीकोन साईनाथ मांडतात. म्हणून तर मला पी.साईनाथ यांचे लेखन प्रेरणादायक वाटते. पी.साईनाथ यांचा आणि माझा सुसंवाद झाला. त्यात मला सत्य उलगडले की पी.साईनाथ स्वतःसाठी जगत नाही. तो लोकांसाठी, लोकांच्या प्रश्‍नांसाठी, नाही रे...च्या वर्गासाठी....म्हणून तर एका सत्यासाठी, उपेक्षितांच्या घटकांसाठी साईनाथ यांची पत्रकारिता आहे. यातच या साध्या माणसाचे मोठेपण सामावले आहे. माध्यमातील जीवघेणी स्पर्धा, भांडवलशाही आणि व्यावसायिक "पॅकेज' पत्रकारितेच्या युगात माध्यमे आपले स्वत्व विसरत चालली आहेत का, असा प्रश्‍न पडतो. म्हणून तर पत्रकारिता ही सामाजिक बांधिलकी आहे, असं म्हटल्यावर आजच्या पिढीतील पत्रकार हसू लागतात, हे खरंही आहे म्हणा. आजूबाजूची पत्रकारिता "धंदेवाईक' होत असताना पी.साईनाथ यांची पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी आहे. साईनाथांची पत्रकारिता दीपस्तंभासारखी आहे. त्यामुळंच त्यांची पत्रकारिता मला आश्वासक वाटते.

Wednesday 11 March 2009

नात्यापल्याडची नाती...


मैत्री...जीवापाड जपलेलं घट्ट नातं. कधी आधार वाटतो, कधी सोबत तर कधी खूप काही काही...खरंच काय असतं त्यात...समजलं तरी अजून तितकसं उमगलं नाही. मला आठवतेय ती मैत्री लहानपणीची. त्या शाळेतील श्याम अजूनही आठवतोय. मी पहिलीत असेन त्यावेळी मी कृष्णाचं गीत गायचो. तस्सं मी म्हटलेलं गीत मला नीटसं आठवत नाही. परंतु, वर्गातील मुलं त्या गीतांवरून मला चिडवायची. जिल्हा परिषदेच्या शाळेत गारवेलच्या झाडाखाली श्याम आणि मी जेवायचो. शाळेसमोरच्या हातपंपाला मान खाली घालून गुरांसारखं पाणी प्यायचो. त्यातला आनंद वेगळाच. कधी रानात भटकायचो. सुईनकिडा (सोनेरी रंगाचा किडा) मला खूप आवडायचा. मी आणि श्याम सुईनकिड्याला काडीपेटीच्या बॉक्समध्ये बंद करून त्याला पाला भरवत असे. का कुणास ठाऊक, त्यातला आनंद निराळाच. शाळेत असताना मी खूप क्रिकेट खेळलो. तसा हा खेळ मला मनापासून आवडायचा. यासाठी मी कित्येकदा घरच्याकडून बोलणी खाल्ली. तापलेल्या उन्हात क्रिकेट खेळायचो. मग, कसली आलीय, जेवणाची भ्रांत ना पाण्याची. अगदी पोटभर क्रिकेट खेळायचो.


मनातलं सारं...सारं..सारं काही आपण मित्राशी `शेअर` करतो. सहवासातून मैत्री रुजते हे मी मान्य करतो. परंतु, सहवास म्हणजे मैत्री नव्हे. कित्येकदा वर्गात इतकी मुलं-मुली असतानासुद्धा आपली मैत्री `त्याच्याशी` किंवा `तिच्याशी`च होते. अस्सं का? याचं उत्तर अजून मला मिळालं नाही. कित्येकदा कितीही जुळवून घेतलं तरी पुन्हा तुटतंच. मैत्री ही काही ठरवून करायची गोष्ट नव्हे, तर ती आपोआप होते. एकमेकांबद्दल आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा वाटतो. मला तर वाटतं, मैत्रीच्या काही खास waves (लहरी) असाव्यात. त्यामुळं ही मैत्री होते, वाढते आणि निरंतर फुलत राहते.

Monday 16 February 2009

दिल से...


व्हॅलेंटाईन डे...तमाम प्रेमीयुगुलांचा हक्काचा प्यार डे...आपल्या प्रिय व्यक्तीला कुणी प्रेमाचा गुलाब देणार तर कुणी प्रेमपत्र देणार...कुणी प्रेयसीला किस करणार तर कुणी मिस करणार...कॉलेजच्या कट्ट्यावर बसून बर्‍याच जणांचे प्रेमपाठ सुरु असतात. त्यात कुणी यशस्वी होतं. तर कुणी अयशस्वी. मुळात काहींचा नेहमी जिंकणं हा हेतूही नसतो. कधी-कधी जिंकण्यापेक्षा हारण्यातही त्यांना जिंकणं वाटतं. कुणावरही प्रेम करणं, हा काही अपराध नाही. आपल्या मनातल्या भावना जर आपल्या प्रिय व्यक्तीजवळ दिलखुलासपणे मांडल्या तर त्या स्वीकारणं ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतात. सागरकिनारी मारलेल्या मनसोक्त गप्पा, कधी हळूच गोड गुपित सांगितलेली गोष्ट, एकमेकांच्या साक्षीने घेतलेल्या आणाभाका आणि सतत हवाहवासा वाटणारा सहवास प्रत्येकानं कधीतरी अनुभवलेला असतो. प्रेम किती हार्ट टू हार्ट आहे, हे सांगण्यासाठी नदीकिनारी वाळीत नाव लिहिणं, गावच्या जत्रेत हौसेखातर हातावर नाव गोंदणं. कधी पिकनिक स्पॉटवरच्या दगडांवर तर कधी एसटीच्या बाकड्यावर तिचं नाव कोरलं जातं. इतरांच्या दृष्टीने तो वेडा असला तरी त्याला वेडेपणातच शहाणपणा वाटतो. सगळ्यांच्या प्रेम व्याख्याही जरा हटकेच. एकमेकांना मनापासून आवडणं. त्याची किंवा तिची प्रतिमा डोळ्यात साठवणं. हृदयात जागवलेली प्रीत नव्यानं जगण्याची उमेद देते. स्वप्नांचं भावविश्व अनेक रंगांनी भरलं जातं, विस्तारलं जातं. सरलेल्या दिवसातल्या उरलेल्या आठवणी मग ताज्या होतात. डायरीची पानं वार्‍याच्या झुळकीनं फडफडायला लागतात तशी उलगडायलाही लागतात. प्रेम हे अमूल्य आहे. प्रेमाला आंधळं म्हटलं जात असलं तरी ते डोळसपणे करायला हवं. मनातलं बोलता आलं नाही म्हणजे प्रेम नाही, असं थोडंच आहे.
प्रेमानं आपल्या जगण्याला नवा अर्थ येतो, हे मान्य आहे. आपण प्रेम करतो, हे जगाला दिसावंच अशा डे संस्कृतीचा हट्ट धरण्याची गरजच? परंतु, जर या निमित्तानं आपली प्रिय व्यक्ती सुखी राहत असेल तर हा निश्चय केला पाहिजे. तिच्या सुखदुःखात सहभागी झालात तर प्रेम सदैव पवित्र आणि अतुट राहील, यात शंका नाही.

Monday 2 February 2009

मज रुप दाखवा...

विठ्ठलाच्या नामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने चाललेले लाखो वारकरी सावळ्या विठोबाचे रुप पाहण्यासाठी आसुसलेले असतात. दर्शन रांगेत जवळ जवळ बारा तास थांबून ज्यावेळी ते या विश्वरूपी विठोबाला पाहतात. त्यावेळी त्यांच्या मनाचे विश्वरूप झालेले असते. या विठठल भक्तीच्या चंद्रभागेत सर्वांनी पवित्र होऊया.....विठठल विठठल विठठल विठठल विठठल........
चोखामेळाच्या अस्थी घेऊन जाताना नामदेव महाराज पंढरपूर रस्त्याला ज्या दोन ठिकाणी विश्रांती घेतली त्या दोन्हीही ठिकाणी विठठलाच्या पादुका आहेत. त्यापैकी एक एकलासपूरच्या जरा पुढे विसावा म्हणून आणि दुसरे मंगळवेढ्यापासून तीन किलो मीटर अंतरावर महादेवाच्या मंदीराजवळ. पूर्वी मंगळवेढ्यातील बरेच लोक पंढरपूरची पायी वारी करायचे, आज ही करतात. पण ज्यांना शक्य होत नाही ते लोक या पादुकांचे दर्शन घेतात. त्यामुळे मंगळवेढ्यात महादेवाच्या मंदिराकडे भाविक भक्तांची रांग असते. आता तर याला एका सहलीचे रुप आले आहे. लहान मुले, वृध्द मंडळी, स्त्रिया हे सगळेजण फराळ घेऊन या ठिकाणी विठ्ठ्लाच्या पादुकाचे दर्शन घेतात आणि आपली वारी पूर्ण करतात.

Wednesday 28 January 2009

मी मंगळवेढेकर


संत बसवेश्वर, चोखामेळा, दामाजी, कान्होपात्रा, स्वामी समर्थ आदी सज्जनांच्या वास्तव्याने पावन झालेले मंगळवेढे. प्रतीशिवाजी नेताजी पालकरांचा पराक्रम झेललेली मंगळवेढ्याची भूमी. ब्रह्मदेवाची मूर्ती असलेल्या जगातील अवघ्या तीन स्थानांपैकी एक मंगळवेढे. ज्वारीचे कोठार म्हणून उभ्या महाराष्ट्रात ख्याती असलेले मंगळवेढ्याचे शिवार. याच शिवाराने विठोबाच्या पंढरीला जगवल्याचा इतिहास आहे. महादेवाचे हेमांडपंथी मंदिर, मुरलीधराचं देऊळ, एकवीरीचा माळ, गैबीपीर, कृष्ण तळं, दामाजीचा आड, कुंभार तळं, मारूतीचं पटांगण, खंडोबाचं राऊळ...म्हणजे मंगळवेढे. त्याच्या चतुःसिमांचे रक्षण करण्यासाठी कोणे एकेकाळी अकरा बुरुज छाती काढून उभे असायचे. संपन्न बाजारपेठ या लौकिकाचं आपलं गाव कालौघात कधीतरी विस्कटलं. गावाचं देखणेपणं उणावलं. माझ्या स्मरणातील मंगळवेढे कदाचित रम्य नसेलही. परंतु, भव्य परंपरा लाभलेले मंगळवेढे माझी मातृभूमी आहे. याच अतूट नात्यात मी गुंतलो आहे. जगण्याची लढाई लढताना हे माझं गाव आज तुटलं असलं तरी माझी नाळ मात्र मंगळवेढ्याशी कायम जोडलेली आहे हे मात्र नक्की. पत्रकारितेतील आमचे मित्र समीर इनामदार, मंदार जोशी, सुकृत करंदीकर हे ही याच भूमीतली, याचा मला अभिमान आहे.