Wednesday 11 March 2009

नात्यापल्याडची नाती...


मैत्री...जीवापाड जपलेलं घट्ट नातं. कधी आधार वाटतो, कधी सोबत तर कधी खूप काही काही...खरंच काय असतं त्यात...समजलं तरी अजून तितकसं उमगलं नाही. मला आठवतेय ती मैत्री लहानपणीची. त्या शाळेतील श्याम अजूनही आठवतोय. मी पहिलीत असेन त्यावेळी मी कृष्णाचं गीत गायचो. तस्सं मी म्हटलेलं गीत मला नीटसं आठवत नाही. परंतु, वर्गातील मुलं त्या गीतांवरून मला चिडवायची. जिल्हा परिषदेच्या शाळेत गारवेलच्या झाडाखाली श्याम आणि मी जेवायचो. शाळेसमोरच्या हातपंपाला मान खाली घालून गुरांसारखं पाणी प्यायचो. त्यातला आनंद वेगळाच. कधी रानात भटकायचो. सुईनकिडा (सोनेरी रंगाचा किडा) मला खूप आवडायचा. मी आणि श्याम सुईनकिड्याला काडीपेटीच्या बॉक्समध्ये बंद करून त्याला पाला भरवत असे. का कुणास ठाऊक, त्यातला आनंद निराळाच. शाळेत असताना मी खूप क्रिकेट खेळलो. तसा हा खेळ मला मनापासून आवडायचा. यासाठी मी कित्येकदा घरच्याकडून बोलणी खाल्ली. तापलेल्या उन्हात क्रिकेट खेळायचो. मग, कसली आलीय, जेवणाची भ्रांत ना पाण्याची. अगदी पोटभर क्रिकेट खेळायचो.


मनातलं सारं...सारं..सारं काही आपण मित्राशी `शेअर` करतो. सहवासातून मैत्री रुजते हे मी मान्य करतो. परंतु, सहवास म्हणजे मैत्री नव्हे. कित्येकदा वर्गात इतकी मुलं-मुली असतानासुद्धा आपली मैत्री `त्याच्याशी` किंवा `तिच्याशी`च होते. अस्सं का? याचं उत्तर अजून मला मिळालं नाही. कित्येकदा कितीही जुळवून घेतलं तरी पुन्हा तुटतंच. मैत्री ही काही ठरवून करायची गोष्ट नव्हे, तर ती आपोआप होते. एकमेकांबद्दल आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा वाटतो. मला तर वाटतं, मैत्रीच्या काही खास waves (लहरी) असाव्यात. त्यामुळं ही मैत्री होते, वाढते आणि निरंतर फुलत राहते.