Wednesday 28 January 2009

मी मंगळवेढेकर


संत बसवेश्वर, चोखामेळा, दामाजी, कान्होपात्रा, स्वामी समर्थ आदी सज्जनांच्या वास्तव्याने पावन झालेले मंगळवेढे. प्रतीशिवाजी नेताजी पालकरांचा पराक्रम झेललेली मंगळवेढ्याची भूमी. ब्रह्मदेवाची मूर्ती असलेल्या जगातील अवघ्या तीन स्थानांपैकी एक मंगळवेढे. ज्वारीचे कोठार म्हणून उभ्या महाराष्ट्रात ख्याती असलेले मंगळवेढ्याचे शिवार. याच शिवाराने विठोबाच्या पंढरीला जगवल्याचा इतिहास आहे. महादेवाचे हेमांडपंथी मंदिर, मुरलीधराचं देऊळ, एकवीरीचा माळ, गैबीपीर, कृष्ण तळं, दामाजीचा आड, कुंभार तळं, मारूतीचं पटांगण, खंडोबाचं राऊळ...म्हणजे मंगळवेढे. त्याच्या चतुःसिमांचे रक्षण करण्यासाठी कोणे एकेकाळी अकरा बुरुज छाती काढून उभे असायचे. संपन्न बाजारपेठ या लौकिकाचं आपलं गाव कालौघात कधीतरी विस्कटलं. गावाचं देखणेपणं उणावलं. माझ्या स्मरणातील मंगळवेढे कदाचित रम्य नसेलही. परंतु, भव्य परंपरा लाभलेले मंगळवेढे माझी मातृभूमी आहे. याच अतूट नात्यात मी गुंतलो आहे. जगण्याची लढाई लढताना हे माझं गाव आज तुटलं असलं तरी माझी नाळ मात्र मंगळवेढ्याशी कायम जोडलेली आहे हे मात्र नक्की. पत्रकारितेतील आमचे मित्र समीर इनामदार, मंदार जोशी, सुकृत करंदीकर हे ही याच भूमीतली, याचा मला अभिमान आहे.