Wednesday 2 March 2011

विठ्ठल माझा...


रात्री उशीराने मी ऑफीसमधून आल्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी उशीरपर्यंत झोपण्याचा माझा इरादा होता. पण, सकाळी दीपक लेंडवेचा फोन आला. विठ्ठल माळीचं निधन झालं म्हणून...माझा विश्वासच बसत नव्हता...मी ते मान्यच करू शकत नाही....आणि आताही ते मान्य करत नाही. खरं तर...विठ्ठल आणि मी तसे शाळेपासून दोस्त....अगदी घट्ट मैत्री...जिवाभावाची...काही खुट्टं जरी झालं तरी तो मला फोन करायचा....खूप वेळ बोलायचा....वेळ नाही मिळाला तर एसएमएस तर आठवणीने पाठवायचा. मग, असा न सांगता तो कसा गेला...हेच मला कळत नाही. मला आठवतंय...मी साधारणतः सहावीला असताना हायस्कूलला आम्ही दोघांनी ऍडमिशन घेतलं. खरं तर विठ्ठलला जिल्हा परिषद शाळेतच शिकावं वाटत होतं. पण, केवळ माझ्या मैत्रीखातर त्यानं हायस्कूलला ऍडमिशन घेतलं. दोघंही एकाच डब्यात जेवायचो. मग, काय, पिठलं-भाकरीही आम्ही चवीनं खायचो. मी दत्ता कुंभार, मधुकर स्वामी, समाधान माळी, चंदू माळी आणि प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या गप्पा रंगायच्या. तासन-तास गप्पांचे फड चालूच राहायचे. अगदी गावापासून ते अमेरिकेतील ग्लोबल वॉर्मिगपर्यत. कोणत्याच विषयाला निर्बंध नसायचे. विठ्ठलसाठी तर कोणताच विषय `वर्ज्य` नसायचा. विठ्ठल बोलण्यापेक्षा युक्ती काढण्यात तसा पटाईत. कोणत्याही गोष्टीवर नामी शक्कल काढण्यात विठ्ठलचा नंबर पहिला असे. विठ्ठलचा स्वभाव म्हणजे सगळ्यांवर प्रेम करणं. खरं तर तो अजातशत्रूच होता. माझ्यावर तर त्याचं खूप प्रेम...का...कुणास ठाऊक...पण, माझी नेहमी बाजू घ्यायचा..खरं तर मला अजूनही आठवतंय. कित्येकदा माझंच चुकायचं...पण, तो मला समजावून माझ्याच बाजूनं उभं राहायचा....
विठ्ठलचा स्वभाव म्हणजे खास वेगळंपण...कोणत्याही विषयावर `लाईटली` घेऊन सर्वांशी मिसळायचा. शाळेत असताना आम्ही खूप खेळलो. विशेषतः क्रिकेट तर पोटभरून खेळलो. क्रिकेट म्हटलं की, विठ्ठल म्हणजे आमच्या टीमचा कायम विकेटकीपर. तो सर्वांची `केअर` घ्यायचा. मित्रांवर खरं प्रेम करणं म्हणजे त्याचा जन्मजात गुणच...कित्येकदा आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी त्याच्या सायकलवर दुसऱ्या ठिकाणी जायचो. विठ्ठल कायमच आमचा सारथी असायचा. क्रिकेटमधले प्लॅन असो किंवा कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्यासाठी विठ्ठल नेहमीच पुढे असायचा. तो सक्सेस व्हायचा....
मला चांगलं आठवतंय...मी दिगंबर भाकरे, संभाजी नागणे, अनिल शिंदे, प्रफुल्ल कुलकर्णी, संतोष लेंडवे आणि बरेच मित्र फिरण्यासाठी कोकणात गेलो होतो. रात्री घाटात असताना प्रचंड पाऊस सुरु होता. घाटात झाड आडवे पडले होते. ते काढण्यासाठी सर्वांची धडपड सुरु होती. आम्ही सगळे जण घाबरलो होतो. पण, विठ्ठल कधीच घाबरत नव्हता. त्याने उतरून दोन किलोमीटरची रांग चालत जाऊन सर्व परिस्थिती पाहिली. त्याने अखेर गर्दीतही गाडीसाठी रस्ता शोधून काढला. आमच्यासाठी तो नेहमीच मार्गदर्शक होता. खूप धडपडी...नेहमी काहीतरी नवीन करण्याचा छंद...अंगात असलेली जिगर...त्यामुळे तो नेहमी यशस्वी व्हायचा.
दिवाळीला सुट्टी मिळाल्याने मी ही गावी गेलो होतो. सगळे मित्र भेटले. छान मैफल रंगली. त्यावेळी विठ्ठल मला भेटला. विठ्ठल भेटला की भरभरून बोलायचा...नेहमी ऐकत राहावे असे वाटायचे. मला तो म्हणाला, अरे मी ट्रॅक्टर घेतला आहे. शेतीची प्रगती छान सुरु आहे. सगळं मस्त सुरु आहे बघ तुझं कसं आहे ते आधी सांग...त्याच्यापेक्षा माझ्याविषयीच तो खूप बोलायचा. आमच्या मित्रांमध्ये सर्वांशी तो मिसळून मनमोकळेपणाने बोलायचा. अशा या माझ्या मित्रानं मला न सांगता सोडून जावं...हे मला पटत नाही. आणि खरं म्हणजे ते विठ्ठलाही पटलं नसतं, हे मला ठाऊक आहे.