Tuesday 12 January 2010

आधुनिक चित्रकलेतील एकलव्य : शशिकांत धोत्रे

































शाळेतील मधल्या सुट्टीत लगोरी, कंचे हे खेळ मनसोक्त खेळणं, सवंगड्यांसोबत मधाच्या पोळ्यांना दगड मारून पाडणं, हे ग्रामीण भागातील मुलांच्या आवडीचे खेळ. बालवयातला हा खोडकरपणा तरुणपणी आठवतांना गप्पा रंगतात. पण, त्या तात्पुरत्याच...मात्र, शशिकांत धोत्रे याने त्या आठवणी कायमस्वरुपी कागदावर कोरून ठेवल्या आहेत. केवळ पेन्सिलच्या साहाय्याने शशीने अप्रतिम चित्र रेखाटली आहेत. कंचे खेळणारा मुलगा, नऊवारी साडीतील सुंदरी, मधाचं पोळं यासारखी चित्रं मन वेधून घेतात. ही गावरान कला शशीने चित्रांबरोबर हृदयातही कोरून ठेवली आहे.
शशीने ग्रामीण जीवनावर काढलेल्या चित्रकृतींना नऊ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत. शशी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावचा. अवघ्या पाच हजार लोकवस्तीचं असलेलं त्याचं हे छोटं गाव. घरात अठराविश्व दारिद्र्य पाचवीला पुजलेलं. वडार समाजात जन्माला आल्यामुळे वडील दगड फोडण्याचं काम करतात. आई मोलमजूरी करून कुटुंब चालवते. शशी लहानपणी शाळेतील भिंतींवर चित्रं काढायचा. अभ्यासात तसा फार पुढे नसायचा. पण, चित्रकलेत त्याला विशेष रस होता. शशी शाळेतील भिंती रंगवून टाकायचा. कित्येकदा, याबद्दल शशीनं शिक्षकांचं बोलणंही खाल्लं आहे. शेवटी कंटाळून शिक्षकांनी शशीच्या आईला सांगितले. शशी अभ्यासापेक्षा शाळेतल्या भिंतीवर चित्र काढून भिंती खराब करतो. पण, म्हणतात ना..मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तसंच झालं...शशीने आपली चित्रकला कायम जिवंत ठेवली. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने पुढे ऍनीमेशन करण्याचा निर्णय घेतला. पण, शिक्षणासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. मोहोळ तालुक्यातील शेटफळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते विजयराज डोंगरे यांनी त्याला बोलावून १५ हजार रुपये दिले. त्याची आठवणही शशी मुद्दाम सांगतो. त्यानंतर शशीने मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला खरा. पण, तिथेही त्याचं मन रमेना. घरात पडलेल्या काळ्या कागदावर शशीने अप्रतिम चित्र रेखाटले. त्याच चित्राला शशीला आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. त्यामुळे शशीचा उत्साह वाढला. त्यानंतर त्याने अनेक चित्रे रेखाटली.

रंगीत पेन्सिलच्या साहाय्याने काळ्या कागदावर चित्रकला करणारा शशी बहुधा पहिलाच चित्रकार आहे. झाडावरून सफरचंद नेहमी खालीच का पडते, याचा विचार करून न्यूटननं जसा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. तसाच शोध शशीने आपल्या चित्रकलेत लावला आहे. लंडनला जूनमध्ये होणाऱ्या चित्रप्रदर्शनात जगातील चार आंतरराष्ट्रीय चित्रकारांत शशीला निमंत्रण देण्यात आले आहे.

मुंबईत असला तरी शशीच्या प्रत्येक चित्रकलेत `गावाकडच्या` मातीचा सुगंध आहे. शाळेत कंचे (गोट्या) खेळणारा गफार त्याला अजूनही आठवतोय. मधाच्या पोळ्याला दगड मारून खाल्लेल्या मधाची गोडी आजही त्याच्या जिभेवर आहे. त्याने तोच गंध आणि सुगंध अत्तराच्या कुपीसारखा चित्रावर रेखाटला आहे.

चित्रकलेत शशीचा तसा कुणी मोठा गुरु नाही. ना कुणी मार्गदर्शन केले. शशी स्वतःच गावाकडच्या कल्पनेत रमतो. कल्पना प्रत्यक्षात कागदावर उतरवतो. शशीचा कुणी द्रोणाचार्य नसला तरी शशी खरा आधुनिक युगातील एकलव्यच आहे.

शशीच्या चित्रप्रदर्शनाला अभिनेता जॅकी श्रॉफनेही भेट दिली. चित्रे पाहून जॅकीदादाही आपल्या बालपणातील आठवणीत अक्षरशः रमून गेला. वाह....भिडू..., एकदम झक्कास...अशी तरतरीत मराठीत दादही दिली.

म्हणून मला सांगावंसं वाटतं की, तुम्ही मोठ्या शहरातून आला की छोट्या गावातून....यातून कोणी मोठा होत नसतो. किंबहुना, मोठेपणाचा हा मापदंडही ठरू शकत नाही. उलट, तुम्ही कुठून येऊन किती मोठे काम केले आहे. यातच खरा मोठेपणा दडला आहे. पण, यासाठी हवी प्रखर इच्छाशक्ती, महत्त्वकांक्षा आणि जिद्दही...!