Thursday 26 August 2010

मीडिया (LIVE)


एका शेतकऱ्याची आत्महत्या....खरं तर...प्रसारमाध्यमांसाठी ही एक छोटीशी बातमी. रोजच्या बातम्यांसारखीच... या बातमीचे गांभीर्य किंवा महत्त्व फॅशन शोच्या बातमीपुढे सर्वांनाच फिके वाटते. सर्व प्रसारमाध्यमांची शक्ती हल्ली फॅशन शो कडे लागली आहे. प्रिंट मीडियातही यांना आता पहिल्या पानावर स्थान मिळतंय. इलेक्ट्रॉनिक माध्यमांतही ही बातमी दाखविल्याशिवाय बुलेटिनच संपत नाही. पण, फॅशन शोच्या बातमीभोवती आपली शक्ती खर्ची होताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारख्या बातमीकडे आपले दुर्लक्ष होते. अहो, म्हणजे, होणारच...त्यात काय एवढं...तुम्ही काय नवीन सांगता..? त्याला कुठे वाचकवर्ग आहे का..? अहो, कडक आणि टंच हिरॉईनचे फॅशन शो पाहण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी कोण वाचेल किंवा कोण पाहील. म्हणजे तेवढा टीआरपी पण मिळणार नाही ना. ? कोणत्या जगात आहात तुम्ही, वस्तुस्थितीचा विचार करा...वाचकांना आणि प्रेक्षकांना काय लागतं माहित आहे का तुम्हाला..?.(जणू काही यांनी प्रत्येक वाचकांना किंवा प्रेक्षकांना विचारून प्रत्येक बातमी ठरविली आहे.) अर्धनग्न किंवा हिरॉईनचे टंच फोटो दाखवले तर कुणाला नाही आवडणार...? ही साधी बाब आहे. त्यात कुठला आलाय रिसर्च. पण, हे ऐकणार कोण..? मुळात माध्यमांची भूमिका काय...हा प्रश्न पडतो. पत्रकारितेच्या वर्गात शिकत असताना माध्यमांची कर्तव्ये काय..? हे शिकलो होतो. पण, दुर्दैवानं पुस्तकातच ती माहिती राहते की काय..? अशी शंका कधी-कधी येते. मुळात पत्रकारितेच्या वर्गात शिकणे आणि प्रत्यक्ष कामाचा कसलाही काडीमात्र संबंध नाही, असाच बहुतांश पत्रकारांचा समज झाला आहे. अहो, इथं कोणतीही हेरॉल्ड लॉस्वेल, डॅनियल लर्नर, एव्हर्ट रॉजर्सची कम्युनिकेशन मॉडेल्स चालत नाहीत..? इथं फक्त रॅम्पवरची मॉडेल्स चालतात..ती व्य़ाख्या वगैरे `डिबार` (हद्दपार) झाली आहे. मग, प्रश्न पडतो तो काय शिकलो त्याचा....
परवा पिपली (लाईव्ह) चित्रपट पाहिला. खरोखरच माध्यमांविषयीचे वास्तव दर्शन या चित्रपटात दाखविले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या..हा गंभीर विषय आहे. पण, माध्यमांवर या चित्रपटात टीका करण्यात आली आहे. चित्रपट एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. पण, त्यामागची माध्यमातील भूमिका सर्वांसमोर येते आहे. ती काही अंशी खरी आहे. हल्ली, ग्रामीण भागातील विषय म्हणजे माध्यमांना चेष्टेचा विषय वाटतो. अहो, रान, वनं दाखवून कुठे टीआरपी वाढतो का..? अहो...बॉलीवूडच्या स्टोरी दाखवा. बघा..टीआरपी कसा वाढतो ते, हे फंडे सांगणारे अनेकजण आहेत. पण, ग्रामीण भागातील प्रश्न मांडण्यासाठी ते सोडविण्यासाठी माध्यमे किती महत्त्व देतात, हा संशोधनाचा विषय आहे. विकास वार्तांना हल्ली माध्यमांमध्ये हवे तेवढे स्थान मिळत नाही. समाजाच्या विकासाला प्रेरक बातम्या दाखविल्या जात नाहीत. किंबहुना त्या पाहिल्या जात नाही, किंवा त्यामध्ये फार `दम` नाही, असंच सर्वांना वाटतं. लव्हस्टोरी असलेले सर्वच चित्रपट चालतात, असं काही नाही. तर पिपली लाईव्हसारखे सामाजिक चित्रपट वेगळ्या धाटणीने मांडला की तो सर्वांना आवडतो. मग, शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळ्या धाटणीने पत्रकारांनी मांडले तर ते लोकांना का आवडणार नाहीत, याविषयी गांभीर्याने विचार करायला हवा.

केवळ एक, दोन लेख लिहून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय संपणारा नाही, त्यासाठी खोलवर जाऊन अभ्यास करायला हवा. माध्यमांनी किती गांभीर्याने हा विषय हाताळला हा संशोधनाचा विषय आहे. वृत्तपत्रात सिंगल कॉलम नाहीतर सजलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया (हल्ली दृकश्राव्य माध्यम हा शब्द खूपच सपक वाटतो.) तर हा विषय खूप चेष्टेचा वाटतोय. अहो, `टीआरपी`च्या नशेत अडकलेले जरा `कडक`, `हॉट` काहीतरी दाखवा, अशी आरडाओरड करणारे, आपण जगावेगळे काहीतरी करतोय, असा अविर्भाव करणारे सगळीकडेच आहेत. पण, मला एक गोष्ट कळत नाही, ग्रामीण भागात ७० टक्के लोक राहतात. मग, सर्व बातम्या शहरी भागातील लोकांसाठीच का असतात..? निवडणुकीतही लोकसंख्येवर आधारित मतदारसंघ ठरतो. त्यानुसार प्रश्न ठरतात. मग, ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न, समस्या माध्यमात का उमटत नाही. त्यांना प्रश्न नाहीत का..? त्यांना माहितीची गरज नाही का..? कशासाठी माध्यमांचा उपयोग होतोय..? कोण उपयोग करतोय माध्यमांचा..? याची सगळी उत्तरे निरुत्तरीत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, विकासाचे प्रश्न माध्यमांत मांडणे ही फक्त सरकारी माध्यमांची जबाबदारी आहे, ते आपले `बीट` नाही. किंबहूना त्यात नवीन ग्लॅमर, थ्रीलर आणि आक्रमक असे काहीच नाही. त्यामध्ये पत्रकाराला फार प्रसिद्धी मिळत नाही, असे पत्रकारांना वाटत असावे. मात्र, एखादाच पी. साईनाथ सारखा पत्रकार उठतो, त्याच्याविषयी लिहितो. पी. साईनाथ यांनी भारताच्या ग्रामीण भागांतल्या दारिद्य्राचा अभ्यास केला. त्यांचे भारतीय दारिद्य्राबद्दलचे संशोधन जगभर गाजले. ग्रामीण भागांतील शोषित, वंचितांचे जीवन हे पी. साईनाथ यांच्यासाठी केवळ संशोधनाचा नव्हे, तर चिंतनाचा विषय आहे. याच भूमिकेतून त्यांनी ""Everybody Loves a good drought'' हे पुस्तक लिहिले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर डॉ. नरेंद्र जाधव यांनी आपले विचार मांडले. विचारांमध्ये मतभेद असले तरी प्रश्न सर्वांसमोर येतोय, हे माध्यमांचे यश नाही का..?

पण, रंगीन बॉलीवूडच्या बातम्यांमध्ये आणि रॅम्ववरच्या मॉ़डेल्सच्या बातम्यांमध्ये गुंतलेल्या पत्रकारांना हे सर्व हास्यास्पद वाटेल. किंबहूना त्यांना ही वायफळ बडबड वाटेल. जे खपतं तेच आम्ही विकतो, हे त्याचं `पर्मनंट` उत्तर ठरलेलं आहे. त्यांना त्या बातम्यांमध्ये अडकवलं जातंय. ते तर काय करणार `बिच्चारे...`. अहो, पत्रकारितेच्या वर्गात शिकताना खूप काही शिकलेलो असतो. पण, प्रत्यक्ष काम करताना कळतं तुम्हाला किती `स्वातंत्र्य` आहे ते..फक्त बोलणं सोप्पं असतं हो...काम करताना कळतं ते....आपण फार पारतंत्र्यात आहोत, असे काही नाही. पण, आपल्याला जे मांडायचं आहे, तेच राहून जातं. मग, आपण बनतो तो फक्त स्टेनोग्राफर आताच्या पिढीतील ठेवणीतला कॉम्प्युटर टाईपरायटर...

ग्रामीण भागातील विकासासाठी माध्यमांनी आता पुढाकार घ्यायला हवा. प्रसारमाध्यमांमध्ये कुठेही नैतिकतेचे भान दिसत नाही. फक्त पेज थ्रीच नाही, तर पेज एक ते चोवीस असा संपूर्ण पेपरच पेज थ्री आहे. स्पर्धेच्या युगात किंबहुना माध्यमांची ती आता गरज बनली आहे. पैसे देऊन अख्खं पान भरून हवा तो मजकूर छापणारे किंवा `प्राईम टाईम`चा स्लॉट विकत घेऊन हवं तस्सं दाखविणाऱ्या जाहिरातदारालाच आता महत्त्व आलंय. प्रसारमाध्यमातील लोकांना सामान्य जनतेचे, त्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्‍नाचे आकलनच दिसत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

एक्सक्लुजिव्ह, स्पेशल, इम्पॅक्ट, दणका, परिणाम नावाखाली आम्हीच सर्वांच्या पुढे...हे दाखवितात. सर्वप्रथम आम्हीच..क्रेडिट घ्यायला हरकत नाही. पण, सर्वजण ते आम्हीच प्रथम कसे, याचा डांगोरा पिटतात. सगळेच कसे पहिल्या नंबरचे असतील, याचं कोडं मला अजून उलगडलं नाही. यांच्यापेक्षा आमच्या गावातला दवंडी पिटणारा रामा मला खरा बातमीदार वाटतो. गावातील बित्तंबातमी तो सर्वांपर्यंत पोहोचवतो. लोकांच्या मदतीला येतो, तोच मला खरा विश्वासार्ह वाटतो.

भारत हा कृषिप्रधान देश आहे, हे आपण सर्वजण मानतो. मग, बातम्यांमध्ये ग्रामीण भागातील आणि शेतीविषयीच्या कितपत बातम्या येतात. प्रत्येक बुलेटिनला बॉलीवूडच्या हेडलाईन्स `कंपल्सरी` असाव्यात, असा आग्रह धरणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या किंवा ग्रामीण भागातील प्रश्नांविषयी हेडलाईन का करावीशी वाटत नाही..? अहमदनगर, सोलापूर, नांदेड, जळगावबरोबर संबंध महाराष्ट्रात खतांच्या टंचाईवरून हाणामारी सुरु आहे. पण, फॅशनच्या बातमीपुढे शेतकऱ्यांच्या बातमीला `न्यूजव्हॅल्यू` ठरत नाही, याचे आश्चर्य वाटते. बातमीदार म्हणून बॉलीवूडच्या बातमीची `व्हॅल्यू` मी नाकारत नाही. पण, शेतकऱ्यांच्या खतांची बातमी `आऊटडेटेड` कशी होते, हेच मला कळत नाही. इतके आपण बोथट झालो आहोत का..? भावनाशून्य...कोरडे...अगदी शुष्क वाळवंटासारखे...

बातमी नसतानाही त्याला मिर्च मसाला लावून बातमी बनविणारे `कारखाने` आहेत. सलमान ज्या-ज्या हिरॉईनबरोबर काम करतो. ती हिरॉईन पुन्हा फ्लॉप गेली आहे. असा तर्क काढून सलमान `लकी` की `अनलकी` ठरविणारे आहेत. इथं मी दोष फक्त पत्रकारांना देत नाही. संबंध यंत्रणेला...नव्या परिभाषेत या `सिस्टीम`ला. ज्यांनी `टार्गेट` ओरिएंटेड पत्रकारितेचे व्रत घेऊन पत्रकारिता सुरु केली. त्यांच्याविषयी मी बोलतो आहे. आपण सारे भोई...फक्त वाहक...गाड्या हाकण्यासाठी...आपण काही बोलू शकत नाही...मांडू शकत नाही...ही मोठी पत्रकारांची शोकांतिका आहे. पत्रकार कुणाविषयीही लिहू शकतो. पत्रकारांना खूप स्वातंत्र्य असते. वगैरे...वगैरे....पण, अंधारात सर्वांना प्रकाश देणाऱ्या दिव्याखाली तर कुठे असतो प्रकाश...होय ना...इथं तर मोठी गोम आहे. मी `निगेटिव्ह` विचारांचा मुळीच नाही. काही माध्यमे याकडे तितक्याच बारकाईने पाहतात, हे मी जाणतो आहे. पण, त्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतपत आहे. परिवर्तन करायचे असेल तर मुळापासून घाव घालायला शिकले पाहिजे, हे आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून शिकलो आहोत.

आजही माध्यमांमध्ये ग्रामीण भागातील गोरगरिबांचे, दीन दलितांचे, उपेक्षित घटकांचे प्रश्न मांडले जात नाहीत. किंबहूना त्यांचे प्रश्न मांडणारा `तिथं` माणूस नाही का? असा प्रश्न पडतो. पॅकेज पत्रकारिता करणाऱ्यांना हे विचार मुळीच पटणार नाहीत. किंबहुना त्यांना हे प्रश्न `शिवत`ही नाहीत. पण, माध्यमांनी याचा गांभीर्यानं विचार करायला हवा नाहीतर काही दिवसांनी हीच पत्रकारिता `हद्दपार` होईल, ही भीती आहे. पूर्वी `समाजाचे प्रश्न मांडणारी पत्रकारिता असायची` असा इतिहास पुढील पिढीसमोर सांगितला जाईल. पण, मी जे बोलतो आहे ते काहींना सारी स्टंटबाजी, भाषणबाजी, दिखाऊपणा वाटायला लागतो. खरंही आहे म्हणा...आपल्या व्यावसायिक पत्रकारितेने आपल्याला हेच `बाळकडू` (`बाळगोड` म्हणायला हवे खरे) दिले आहे. त्यामुळे त्याचं हेच GENNEXT आहे, हे मानायलाच हवे.

समाजातील दुर्बलतेकडे निर्देश करते ती खरी पत्रकारिता, अशी पत्रकारितेची सरळसोपी व्याख्या पी. साईनाथ करतात. गरिबांचे अधिकार आणि त्यांच्या हक्कांविषयी सजगतेने वृत्तपत्रांमध्ये अधिक वृत्तांत यावेत, अशी अपेक्षा पी. साईनाथ यांची असते. मला माहित आहे, मी काही बोलतो आहे ते तुम्हाला माहित नाही, असे नाही. ते तुम्हीही चांगले जाणून आहात. मी स्पष्ट बोलतो आहे. यातून काहीही साध्य होणार नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर तस्सं प्लीज समजू नका. समाजातील आपण एक भाग म्हणून ग्रामीण भागातील विकासासाठी आपण सुरवात करुया...अस्सं म्हणतोय...हे लक्षात घ्या...तर मग, चला पेन उचला...