Saturday 11 January 2014

सिध्दरामेश्वरांचा सच्चा वारकरी...!


सोलापूरचे ग्रामदैवत सिध्दरामेश्वरांमुळे सोलापूरची एक वेगळीच ओळख आहे. मंदिरात गेलं की, खूप प्रसन्न आणि उत्साही वाटतं. शांत वातावरण, चहुबाजूंनी पाणी आणि पुरातन मंदिर असूनही असलेली स्वच्छता यामुळे मंदिराचे पावित्र्य अधिकच जाणवतं. दरवर्षी १४ जानेवारी अर्थात संक्रांतीच्या दिवशी यात्रा भरते. सोलापूरच्या या गड्डा यात्रेत पांढरीशुभ्र वस्त्र परिधान केलेली मंडळी सर्व जातीभेद, धर्मभेद विसरून एकत्र येतात, हे यात्रेचं वैशिष्ट्य. हीच गड्डा यात्रा लहानपणापासून डोळ्यांत साठवून तीच चित्रांव्दारे कुंचल्यातून दाखविणारे मूळचे सोलापूरचेच असलेले पण सध्या मुंबईत वास्तव्य असलेले जॉन डग्लस आहेत. पंढरीच्या वारीप्रमाणेच तेही दरवर्षी सिध्दरामेश्वरांची यात्रा न चुकता करतात.
सध्या ते मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकलेचे धडे देतात. जॉन डग्लस सरांचा जन्म सोलापूरचा. सरांना चित्रकलेची लहानपणापासून आवड होती. ते धर्माने ख्रिश्चन हे वेगळे सांगायला नको. पण, विशेष गोष्ट अशी की धर्माने ख्रिश्चन असूनही मित्रांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जायचे. या संघामध्ये त्यांनी अनेक महाभारतातल्या-रामायणातल्या कथा ऐकल्या. कदाचित सांगणाऱ्याचे वैशिष्ट्य असेल ज्यामुळे या कथांमधील व्यक्तिरेखा, घटना, वास्तू कशा असतील याची कल्पना डोळे आणि मन करू लागले आणि इथेच खऱ्या अर्थाने चित्रांची चौकट मनाने पकडायला सुरवात केली.
जॉन सरांच्या मते एखादी कला अशीच निर्माण होत नाही. कवी मनावर आघात झाल्यावर कवितेची निर्मिती होते. त्याचप्रमाणे त्यांच्याही मनात सोलापूरबद्दल या जन्मभूमीबद्दल सिध्दरामेश्वरांबद्दल आपुलकी जोडलेली आहे. ८५० वर्षाची परंपरा असलेली पण कुठेतरी दडलेली लोकांच्या मनात नजरेत न आलेली एक संस्कृती आहे. जी पंढरीच्या वारीइतकीच महत्त्वाची आहे. सिध्देश्वर आणि त्यांचे एक अतूट नाते झाले आहे. सिध्दरामेश्वरांची ६८ शिवलिंगे स्थापन केली. या शिवलिंगाभोवती जवळ जवळ एक ते दोन लाख भाविक परीट घडीची पांढरीशुभ्र वस्त्रे परिधान करून सारं काही विसरून प्रदक्षिणा घालतात. ही परिक्रमा, मिरवणूक सकाळी साडेसातला आरंभ होऊन पहाटे साडेतीनला तिची सांगता होते. दरवर्षी संक्रांतीच्या आधी सोलापूर शहरात निघणाऱ्या श्री. सिध्दरामेश्वरांच्या या गड्डा यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून या यात्रेसाठी जमणाऱ्या तमाम भाविकांच्या भावनांना जॉन डग्लस यांनी जिवंत केले आहे. जॉन सर  सोलापूरचे असल्याने या यात्रेचे सौंदर्य त्यांनी रंगात अचूक पकडले आहे. गड्डा यात्रेतील विविध पैलू वेगवेगळ्या व्यक्तिरेखा चित्रित करून लोप पावत असलेल्या संस्कृतीला पुन्हा एकदा दृष्टीक्षेपात आणण्याचा प्रयत्न आपल्या कुंचल्याव्दारे सरांनी केला आहे. तर अशा या संस्कृतीचे लोक जातीभेद, वर्णभेद, रंगभेद विसरून एकाच पांढऱ्या रंगाच्या वस्त्रात जमून मनोभावे शिवलिंगाला तेलाचा अभिषेक करतात. अनवाणी पायाने चटके खात, ठेचकाळत ते पदयात्रेत सहभागी होतात.
लहान असताना जॉन डग्लस वडिलांबरोबर चर्चमध्ये `प्रे`साठी जायचे. सोलापूरचा हा चर्च जवळ-जवळ एकशे दहा वर्ष जुना आहे. त्याच्या भिंतीवर खूप मनोवेधक चित्रं चितारलेली आहेत. ही भित्तीचित्रं कुठंतरी जॉन यांच्या बालमनावर परिणाम करत होती. सरांच्या बहिणीला इंटरमिडीयट ड्राईंगमध्ये गोल्ड मेडल मिळाले होते. तिनेच सरांना या क्षेत्रात मदत केली. प्रोत्साहन दिले. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत तितकेसे लक्ष दिले गेलो नाही. पाचवी ते दहावी या शालेय कालावधीत हा मार्ग निश्चित झाला, असे म्हणायला हरकत नाही. दिवाळी, ख्रिसमससारख्या सणांच्या निमित्ताने होणाऱ्या स्पर्धांमध्ये विशेष वाव मिळाला. शालेय शिक्षण छत्रपती शिवाजी शाळेमध्ये व प्राथमिक शिक्षण सेवासदन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेमध्ये झाले.
या शाळांमध्ये अभ्यासाबरोबरच इतर कलागुणांनाही मोठ्या प्रमाणावर वाव दिला जायचा. सरांना घडवले ते याच शाळांनी...त्यावेळचे शाळेचे मुख्याध्यापक ग.सा.पवार यांनी डग्लस सरांना घडविणारे प्रा.शहाजीराव घोरपडे हे आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. पण, प्रा.रविराज ओमणे मात्र आजही विद्यार्थी घडविण्याचा वसा जपत आहेत.

जे.जे.स्कूल ऑफ आर्टसच्या वेटिंग लिस्टवर सरांचा क्रमांक सहावा होता. सर ठाण्याला बहिणीच्या घरी राहत असत. सरांना पूर्वीपासून मुंबईचं आकर्षण. मुंबईत आल्या आल्या सर्व प्रथम मनात भरली ती मुंबई स्टेशनची इमारत. मग, मुंबईतील व्यावहारिक दैनंदिन जीवनाचे सरांच्या मनातील एका कोपऱ्यावर वर्चस्व मिळविले. आणि सरांना विषय़ मिळाला. मुंबईतील व्यावहारिक दैनंदिन जीवन विषयावर अनेक चित्रे काढली. आणि छोटीशी फिल्म काढली. यात व्हिक्टोरिया घोडागाडीतून मुंबई नगरीला फेरफटका मारत असल्याचा आभास होतो. या चित्राला महाराष्ट्र सरकारचे पहिले पारितोषिक विद्यार्थीदशेतच मिळाले. याचबरोबर राज्य पुरस्कार विजेता चित्रकार म्हणून महाराष्ट्र शासनाने गौरवले.